२०२० साल मानवजातीसाठी घातक आणि कमालीचं संकट मय ठरत आहे. गेली काही महिने संपूर्ण जगभर फैलवलेल्या कोरोनासारख्या महामारिने जगाला ग्रासले आहे. मानवजात हवालदील झाली आहे. संपूर्ण जीवनमान विस्कळीत होऊन देशाची अर्थव्यवस्था ही ढासळली आहे. त्यातच धावपळीच्या या जगात सर्वच जनता आप आपल्या घरात एखाद्या कैद्या सारखं जीवन जगत आहे. आज पर्यंत असं कधी घडलं नव्हत, संपुर्ण जगच लॉक डाऊन झाल आहे.
परंतु अश्याही परिस्थितीत या भयंकर अवस्थेला तोंड देत, जगाला जागवणारा शेतकरी आपलं प्रामाणिक कर्तव्य बजावताना असफल ठरत आहे. शेती संकटावर मात करण्यासाठी शेतकरी परिषदेच्या आदेशाने केंद्राने डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या अध्येक्षतेखली समिती स्थापना केली होती, परिपूर्ण अभ्यासा अंती समितीने आपला अहवाल सादर केला. शेतकरी हिताचा अहवाल केंद्राला सादर करण्यात आल्यानंतर हि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचं स्पष्ट होत. मग सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासीन का? शेतकऱ्याला त्याच्या मालाला ५०% हमीभाव तर सोडा पण शेतकरी आत्महत्या ही रोखण्यात सरकार अपयशी ठरत आहे. शेतकऱ्यांच्या या अवस्थेला जबाबदार कोण?
त्यातच शेती आणि शेतकरी संकटात अजुन एक भर म्हणूनीच कि काय, निसर्ग हि शेतकऱ्यांकडे पाठ फिरवीत आहे. मग या जगाच्या पोशिंद्यान जगायचं कसं? हा खरा सवाल आहे. आज महाराष्ट्राच्या ग्रामीण आदिवासी भागात राहणाऱ्या मध्यम वर्गीय शेतकऱ्याची अवस्था या लॉक डाऊन च्या काळात बिकट झाली आहे. वर्षभरात एकमेव भाताच पिकं घेणारा शेतकरी आज आपली नजर आभाळाकडे रोखून बसला आहे, बळीराजाची वाट पाहत. परंतु भर पावसाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव येतो आहे. शेतकऱ्यांच्या मनात नैराश्य ची छटा उमटत आहेत, पाऊस पडलाच नाही तर?
पावसाची नक्षत्र हि बेडकावर, हत्तीवर, आणि अजुन कश्या, कश्या वर बसुन निघुन चलेत, जुन्या समजुती सगळ्या. आज घडीला शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचा एक थेंब शिल्लक राहिला नाही. भात लागवडीसाठी ज्यावेळी चिखलाची गरज भासते त्यावेळी मातीची ढेकळे टोचू लागलेत पायाला, ओढे नाले कोरडे खडखडीत दिसत आहेत. भाताच्या रोपांची वाढ होऊन मुळे जमिनीत खोल शिरु लागली आहेत. काही तर सडायला लागली आहेत.
खरेतर जुन महिन्यात पावसाला सुरुवात होते, आज २ अडीच महिने झाले तरी, पाण्याविना शेती ओस पडली आहे. आधीच लॉक डाऊनच्या काळात शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खाते विकत घेण्यासाठी शेतकऱ्याने आपल्या पदरचा पैसा गमवला आहे, त्यातच रोजगाराची कुठलीही संधी उपलब्ध नाही. किसान सभे सारख्या शेतकरी संघटनेच्या प्रयत्नाने मनरेगा अंतर्गत कामे प्रशासनाने मंजूर केली, परंतु मागेल त्याला काम मिळेल याची शाश्वती नाही. मध्येच काही दिवसांपूर्वी झालेल्या निसर्ग चक्री वादळच्या थैमानाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची वित्त हानी झाली आहे, कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांच्या माथ्यावर पडला.
शेतकरी पार मेटाकुटीला आला असताना निसर्गाचा खेळ काय थांबत नाही. परंतु निसर्गापुढे आपण तरी काय करणार, आपण फक्त एवढाच करू शकतो, पावसाचे हे लॉकडाऊन कधी उठणार याची वाट पाहू शकतो. बसं!
– रोहिदास मंता बोऱ्हाडे
– देवळे ता. जुन्नर जि. पुणे
(लेखक अखिल भारतीय किसान सभेचे सदस्य आहेत.)