आरोग्यम् धनसंपदा मंत्र कृतीत आणा
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : माणसाचा जन्म झाला की एक दिवस मृत्यू होणारच असतो. पण शारीरिक काळजी म्हणून मधुमेह, रक्तदाब असे इतर विकार निष्पन्न झाल्यावर माणसांनी नियमित औषधे आणि गोळ्या खाणे क्रमप्राप्त आहे. यात चुका होऊ देऊ नयेत.कवी उद्धव कानडे यांनी जीवनभर केलेले कार्य विचार हे आपल्या स्मरणात राहील मात्र,वाढत्या वयात शरीरस्वास्थ जपायला शिकावे.सर्वांनीच या नियमांचे पालन करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत टाटा मोटर्सचे माजी सरव्यवस्थापक मनोहर पारळकर यानी व्यक्त केले.
पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी , महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा, लायन्स क्लब भोजापुर गोल्ड, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य, दिलासा संस्था, शब्दधन काव्यमंच,महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद या संस्थांच्या वतीने महाराष्ट्रातील प्रख्यात कवी उद्धव कानडे आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पुणे विभागाचे कल्याण निरिक्षक संजय सुर्वे यांना भावपूर्ण श्रद्धांजली सभा वात्सल्य हॉस्पिटल हॉल भोसरी येथे आयोजित करण्यात आली.
यावेळी प्रख्यात कवी विठ्ठल वाघ, टाटा मोटर्सचे माजी सरव्यवस्थापक मनोहर पारळकर, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे, लायन्स क्लब भोजापुरचे अध्यक्ष डॉ. शंकर गायकवाड, दिलासा आणि शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, अशोक सहकारी बँकेचे अध्यक्ष राजरत्न शीलवंत, साहित्यिक शिवाजी चाळक, निवेदक दिगंबर ढोकले, सुप्रिया सोलांकुरे, गरवारे वॉल रोपचे कामगार प्रतिनिधी भगवान धाडवे यांची उपस्थिती होती.
डॉ. अनु गायकवाड यांनीही मनोगतातून सूचित केले की, आजच्या काळात मधुमेह अन् हृदयविकार याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नियमित शारीरिक चाचण्या करून घ्याव्यात. रक्त पातळ होण्याच्या गोळ्या, मधुमेहाच्या गोळ्या घेण्यात कसूर करू नये.
काशिनाथ नखाते म्हणाले.. “कवी उद्धव कानडे यांच्या कवितांना कष्टकरी कामगारांच्या घामाचा सुगंध होता. त्यांची मनुसपणाची सनद कायम स्मरणात राहिल, कामगार कवींचे प्रबोधन आणि मार्गदर्शन करणारा कवी हरपला आहे.
प्रभाकर वाघोले कवितेतून आदरांजली वाहताना म्हणतात..
सोडूनिया गेले कविराज आम्हा मित्र बांधवांना..
कविराज कविराज आता आम्ही म्हणावे कुणाला?
कामगारभूषण जयवंत भोसले, कामगार नेते अरुण गराडे,मुकुंद आवटे,अरुण इंगळे यांनीही भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केली.सलीम डांगे,किरण साडेकर,परमेश्वर बिराजदार यांची उपस्थिती होती.
पसायदान म्हणून शोकसभेची सांगता झाली.