Friday, April 25, 2025
---Advertisement---
---Advertisement---

निगडी प्राधिकरण येथे ऑक्टोबर महिन्यातील ‘वाचकमैफल’ संपन्न

नवोदित लेखक, कवींच्या सदैव पाठीशी – गझलकार अनिल आठलेकर

---Advertisement---

संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती वाचक मैफल उत्साहात

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : “लिहित्या हातांनी जबाबदारीने लेखन करावे. ‘वाचकमैफल’ सदैव नवोदित लेखक/कवी यांच्या पाठीशी असेलही महत्त्वाची घोषणा संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती साहित्य विधा आणि “वाचक मैफल” यांच्या वतीने आयोजित वाचकमैफल मध्ये पार पडलेल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी कवी, गझलकार, अनिल आठलेकर यांनी केली.   

---Advertisement---

सावरकर सदन येथील कॅप्टन कदम सभागृह, निगडी प्राधिकरण येथे ऑक्टोबर महिन्यातील ‘वाचकमैफल’ (दि.९) रोजी संपन्न झाली. साहित्य विधा सदस्य व नवोदित कवयित्री रूपाली हंबर्डे यांच्या ‘ऋतू बहरताना’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन हे या महिन्याच्या वाचक मैफलचे मुख्य वैशिष्ट्य होते.

यावेळी वाचकमैफल संस्थापक अनिल आठलेकर, सहसंस्थापिका अन्वी आठलेकर, संस्कार भारती पश्चिम प्रांत साहित्य संयोजक विशाखा कुलकर्णी, साहित्यविधा संयोजक प्रणिता बोबडे,  साहित्य सहविधा संयोजक शुभदा दामले, प्रकाशक नितिन हिरवे (संवेदना प्रकाशन) आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

आठलेकर यांनी उपस्थित वाचकांना सांगितले की, कोणालाही आर्थिक किंवा अन्य कोणत्याही समस्येमुळे प्रकाशन सोहळा करणे शक्य नसल्यास वाचकमैफलचे व्यासपीठ पुस्तक प्रकाशनासाठी सदैव उपलब्ध करून देण्यात येईल. काव्यसंग्रह प्रकाशनाआधी संस्कार भारती ध्येयगीताने वाचकमैफलची सुरुवात झाली.

साहित्यविधा संयोजक प्रणिता बोबडे  यांनी प्रास्ताविकात साहित्य विधेच्या सर्व उपक्रमांची वाचकांना माहिती दिली. त्यानंतर साहित्य सहविधा संयोजक शुभदा दामले यांनी आपल्या ओघवत्या शैलीत ‘खरं सांगायचं तर- माधव खाडीलकर’ या पुस्तकाचा रसास्वाद सादर केला. यावेळी स्मिता कुलकर्णी यांनी पुस्तकातील समर्पक उतार्‍यांचे सुरेख वाचन केले. 

सुनीता कुलकर्णी यांनी ‘नारायण मूर्ती जीवन चरित्र – रितू सिंग/अनुवाद विद्या अंबिके’ या पुस्तकावर  आपले मत मांडले. अन्वी आठलेकर यांनी ‘धग – उद्धव ज. शेळके’ यावर भाष्य करताना अमरावती-भागातील बोली भाषा तसेच म्हणी इत्यादीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी अवश्य वाचावे असे सांगत असताना पुस्तकातील विविध उदाहरणे दिली. 

विशाखा कुलकर्णी यांनी ‘मनाचा वॉर्डरोब- अनिल आठलेकर’ या गझल संग्रहाचा रसास्वाद सादर केला. उपस्थित सर्व वाचकांनी यावेळी चर्चेत सहभाग घेत नेहमीप्रमाणेच मैफल बहारदार केली. सोमवार असूनही वीसहून अधिक सदस्यांची हजेरी होती, ही उल्लेखनीय बाब होती. पिंपरी चिंचवड समिती अध्यक्ष सचिन काळभोर यावेळी उपस्थित होते.

वाचकमैफलीत उत्तम पुस्तक परिचय सादर केलेल्या वाचकास प्रकाशक नितीन हिरवे यांच्याकडून एका पुस्तकाची भेट दिली जाते. अशी पुस्तक भेट याही वेळी ३ वाचकांनी मिळवली आहे. उत्साहात पार पडलेल्या या वाचकमैफलीत पुन्हा भेटण्याची सर्वांनीच इच्छा करत कार्यक्रमाचा समारोप झाला.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles