आयुक्त योगेश म्हसे यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठक (PCMC)
नदीसुधारसह, वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा
पिंपरी चिंचवड – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित विविध विकासकामांसाठी भाजपा नेते व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त योगेश म्हसे यांच्या उपस्थितीत सविस्तर मॅरेथॉन बैठक घेतली. शहर विकास, वाहतूक सुलभीकरण, नदीसुधार, औद्योगिक प्रदर्शन केंद्र आणि शिक्षण सुविधा या विषयांवर बैठक झाली. प्रलंबित कामांना गती देण्यासाठी आणि निधी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आमदार लांडगे यांनी स्पष्ट सूचना दिल्या. (PCMC)
या बैठकीत पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, मुख्य अभियंता रीनाज पठाण, सीईओ हिम्मत खराडे, सहआयुक्त दीप्ती सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नदीसुधार प्रकल्पाला प्राधान्य
इंद्रायणी व पवना नदी सुधार प्रकल्पासंबंधी सादरीकरण करण्यात आले. दोन्ही नद्यांमधून महापालिका पाणी उचलते, त्यामुळे त्यांचे स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले. प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी तातडीने अंमलबजावणीची आवश्यकता असल्याचे आमदार लांडगे यांनी नमूद केले. (PCMC)
औद्योगिक प्रदर्शन केंद्राला ‘हिंदुभूषण’ची ओळख
पीएमआरडीएच्या जागेवर उभारण्यात येणारे औद्योगिक प्रदर्शन केंद्र “हिंदुभूषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र” या नावाने ओळखले जावे, अशी मागणी लांडगे यांनी केली. यावर आयुक्त म्हसे यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन दिले.
शिक्षण संस्थांसाठी भूखंड व सुविधा
शहरात फर्ग्युसन, एसपी, ज्ञानप्रबोधिनी, सिंबायोसिस यांसारख्या नामांकित संस्थांनी शाखा सुरू कराव्यात यासाठी भूखंड व मूलभूत सुविधा द्याव्यात, अशी विनंती आमदार लांडगे यांनी केली. त्यासाठी संयुक्त बैठक घेण्याचे ठरले.
वाहतूक कोंडीवर उपाययोजना
पुणे-नाशिक महामार्गावरील एलिव्हेटेड कॉरिडॉर, तळेगाव-शिक्रापूर रस्ता आणि इनर रिंगरोड प्रकल्पांना गती देण्याची सूचना त्यांनी केली. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मिसिंग लिंक पूर्ण करणे, पर्यायी रस्त्यांचे नियोजन आणि भूसंपादन तातडीने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. (PCMC)
आमदार महेश लांडगे यांची प्रतिक्रिया :
“पिंपरी-चिंचवड शहर प्रगतीपथावर आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून शाश्वत विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. विविध प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी ही बैठक महत्त्वाची होती. शहराच्या भौगोलिक व सामाजिक गरजांसोबत सुसंगत योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.”