Thursday, December 26, 2024
Homeकृषीशेतकरी आंदोलन : किसान सभेच्या नेतृत्वाखाली १५,००० शेतकरी कसारा घाट पायी उतरले,...

शेतकरी आंदोलन : किसान सभेच्या नेतृत्वाखाली १५,००० शेतकरी कसारा घाट पायी उतरले, कल्याण फाटा, ठाणे शहर व मुंबई शहरात जनतेने केले स्वागत

मुंबई : आज 24 जानेवारी रोजी सकाळी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या 21 जिल्ह्यांतील 15 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी सकाळी 9 वाजता इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी येथून कूच केली आणि अडीच तास चालून कसाऱ्याजवळ त्यांनी पुन्हा गाड्यांमध्ये बसून आपली आगेकूच सुरू केली आहे.

या वाहन जथ्याचे नेतृत्व किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, राज्य पदाधिकारी सुनील मालुसरे, बारक्या मांगात, रतन बुधर, रडका कलांगडा, सावळीराम पवार, सुभाष चौधरी, दादा रायपुरे, अर्जुन आडे, शंकर सिडाम, उद्धव पोळ, उमेश देशमुख, उदय नारकर, माणिक अवघडे, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे व राज्य सरचिटणीस प्राची हातिवलेकर, सीटूचे राज्य सचिव व माकपचे आमदार विनोद निकोले, डीवायएफआय च्या राज्य सरचिटणीस प्रीती शेखर, उपाध्यक्ष नंदू हाडळ व इंद्रजीत गावीत, एसएफआय चे राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड, सरचिटणीस रोहिदास जाधव व उपाध्यक्ष कविता वरे आणि किसान सभेच्या राज्य कौन्सिलचे अनेक सदस्य करीत आहेत. 

इगतपुरी व शहापूर तालुक्यांच्या अनेक करखान्यांसमोर सीटूच्या शेकडो कामगारांतर्फे शेतकरी जथ्याचे हार्दिक स्वागत करण्यात आले. कल्याण फाट्यावर माकप, सीटू, डीवायएफआय आणि अमृत वेली गुरुद्वारा यांच्यामार्फत सर्व शेतकऱ्यांना जेवणाची पाकिटे दिली गेली. ठाणे शहरात माकप व शेकाप यांच्यातर्फे उत्साही स्वागत केले गेले. 

मुंबईत विक्रोळी येथे माकप, सीटू, डीवायएफआय, जमसं च्या शेकडो कार्यकर्त्यांनी महेंद्र सिंह व हेमकांत सामंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वांचे स्वागत केले. 

आज सायंकाळी किसान सभेचा हा वाहन मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचेल आणि तेथे संयुक्त शेतकरी कामगार मोर्चातर्फे सुरू झालेल्या महामुक्काम आंदोलनात सामील होईल अशी माहिती “महाराष्ट्र जनभूमी”शी बोलताना अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी दिली.

उद्या सकाळी 11 ते दुपारी 2 या काळात मोठी जाहीर सभा होईल आणि त्यानंतर राज भवनावर 50,000 हून अधिक शेतकरी-कामगार आणि जनतेचा विशाल मोर्चा निघेल. कॉर्पोरेटधार्जिणे असलेले तिन्ही कृषी कायदे आणि चारही श्रम संहिता रद्द करा, वीज विधेयक मागे घ्या आणि शेतकऱ्यांसाठी रास्त हमी भावाचा कायदा करा या मुख्य मागण्या केल्या जाणार आहेत. 

२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ध्वजाचे वंदन आणि राष्ट्रगीत गाऊन तसेच शेतकरी-कामगारांचा लढा कोणत्याही परिस्थिती विजयी करण्याच्या निर्धारासह कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय