जुन्नर : शिरूर तालुक्यातील शिक्षण विभागातील अधिकारी यांनी जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळा, उच्छिल या शाळेस सदिच्छा भेट दिली. शिरूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर आणि त्यांच्या समवेत शिक्षण विस्तार अधिकारी बीट कवठे, बाळकृष्ण कळमकर, शिक्षण विस्तार अधिकारी, बीट पाबळ लक्ष्मण काळे, शिक्षण विस्तार अधिकारी बीट सरदवाडी किसन खोडदेे, शिक्षण विस्तार अधिकारी बीट न्हावरे रघुनाथ पवार यांनी भेट देऊन शाळेची पाहणी करत असताना शाळेत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.
त्यामध्ये सुंदर हस्ताक्षर, सुंदर परसबाग, भिंतीवर केलेले सुंदर चित्रकाम तसेच अतिदुर्गम डोंगराळ आदिवासी भागातील लोकसहभागातून साकारलेला सुसज्ज संगणक कक्ष, संगणकावर दिले जाणारे वेळापत्रकानुसार शिक्षण आणि पावसाळ्यातही चालू असलेली लॅब पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. येथील शालेय रेकॉर्ड व शिक्षकांचा उत्साह आणि उल्लेखनीय बाब स्वच्छता आणि टापटीप, येथील शैक्षणिक परिस्थिती भौतिक सोयी सुविधा, सुरु असणारी कामे आणि शिक्षकांची असणारी तळमळ ही एक अभिमानास्पद बाब असल्याचे अधिकारी वर्गाने सांगितले. सर्व शिक्षकांना व मुलांना पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या. मनोगत व्यक्त करताना बाळकृष्ण कळमकर यांनी गौरवद्धार काढले.
सर्व अधिकारी वर्ग यांचे उच्छिल शाळेच्या वतीने सन्मान व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक व जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक अन्वर सय्यद, पदवीधर शिक्षक व अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोहरे, स्मिता ढोबळे, आरती मोहरे व लिलावती नांगरे यांनी केले.