मुंबई : राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्त्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे. दहावीसाठी साधारणत: 16 लाख तर बारावीसाठी 15 लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षीचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून 15 मार्च पासून विविध विषयांसंदर्भात माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. अन्य मंडळांच्या परिक्षांच्या तारखा पाहूनच वेळापत्रक केल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.