महात्मा फुलेंचे विचार, कार्यकर्तृत्व आजही मार्गदर्शक
मुंबई : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विनम्र अभिवादन केले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘महात्मा फुले यांचे विचार, कार्यकर्तृत्व आजच्या परिस्थितीतही मार्गदर्शक आहेत. त्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ही मुल्ये रुजविण्यासाठी आयुष्य वेचले. अनिष्ट रुढी-प्रथामुक्त आणि शोषणमुक्त समाजाचा आग्रह धरला. स्त्री-शिक्षणासह विविध सामाजिक सुधारणांसाठी क्रांतीकारी पावले उचलतानाच महात्मा फुले यांनी शेती-सिंचन, औद्योगिक आणि पायाभूत विकास क्षेत्रातही कृतीशील योगदानाचा आदर्श उभा केला. त्यांच्या या मार्गदर्शनानुसार वाटचाल करण्यासाठी आपणही वचनबद्ध होऊया. सत्यशोधक, थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन’’.