पुणे : पुणे जिल्ह्यातील, देवस्थान, इनाम वर्ग तीनचे शेतकरी यांचा जिल्हास्तरीय मेळावा पुणे शहरात नुकताच, पार पडला. देवस्थान, इनाम वर्ग तीनचे शेतकरी यांनी संघटित होणे किती आवश्यक आहे याविषयी, उपस्थित शेतकऱ्यांना, किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉ. उमेश देशमुख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कॉ.देशमुख म्हणाले, राज्यात देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमिनी, हजारो शेतकरी पिढ्यांपिढ्या कसत आहेत. मंदिर, मस्जिद, मठ, दर्गाह अशा विविध प्रकारच्या देवस्थानाची, पुजाअर्चा, दिवाबत्ती करणे, देखभाल करणे, याकरिता राजेरजवाड्यांच्या काळात या कुटुंबाना, इनाम दिलेले आहे. स्वातंत्र्यानंतर शासनाने इतर सर्व प्रकारची इनामे खालसा केली, परंतु इनाम वर्ग ३ मात्र खालसा न केल्याने अद्यापही या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे होऊ शकल्या नाहीत.
यामुळे या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्जासह शेतीवर मिळणाऱ्या विविध सरकारी योजना आणि अनुदाने मिळू शकत नाहीत. शेतपिकांचे नुकसान झाले तर त्याची नुकसान भरपाई पासून हे शेतकरी वंचित रहात आहेत. अखिल भारतीय किसान सभेने या संदर्भात अनेक वर्षांपासून या शेतकऱ्यांना संघटीत करून लोकशाही लढ्याच्या मार्गाने या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधलेले आहे, असेही ते म्हणाले.
इतर इनाम वर्ग खालसा करून, कसणाऱ्या शेकऱ्यांच्या नावे ज्याप्रकारे जमिनी करण्यात आल्या, अशा प्रकारे इनाम वर्ग ३ खालसा करून, पिढ्यांपिढ्या कसणाऱ्या शेतकऱ्यांना या जमिनी मिळाव्यात ही मागणी किसान सभेने सरकारकडे केलेली आहे. नुकतेच किसान सभेच्या नेतृत्वा खाली दोन मोठे शेतकऱ्यांचे लॉंग मार्च झाले. यावेळी मोठ्या संख्येने इनाम वर्ग ३ जमिनी कसणारे शेतकरी सहभागी झालेले होते.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/05/e07184c1-bb8a-48b0-ac73-2b1b4aaa7740-1024x576.jpg)
यावेळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री यांनी यासंदर्भात कायदा करून लवकरच या जमिनी शेतकऱ्यांना देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन आंदोलक शेतकऱ्यांना दिले आहे.
सरकार, याबाबत कायदा करणार असले तरी या कायद्याचा मसुदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा कसा असेल, याविषयी किसान सभेने या आंदोलनात प्रश्न उपस्थित केले होते. याला अनुसरून सरकार कायदा करताना कायद्याच्या मसुद्याबाबत किसान सभेसोबत चर्चा करेल असेही आश्वासन सरकार कडून किसान सभेला देण्यात आले आहे.
राज्यभरात असलेला हा शेतकरी संघटित करून, लाँग मार्च वेळी, सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी आणि राज्यव्यापी शेतकरी लढयासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहे. याचाच भाग म्हणजे, नुकतेच पुणे शहरात पुणे जिल्हातील, इनामवर्ग ३ च्या शेतकऱ्यांचां मेळावा पार पडला. व यावेळी जिल्हास्तरीय समन्वय समिती जाहीर करण्यात आली.
या वेळी किसान सभेचे माजी जिल्हा अध्यक्ष अॕड. नाथा शिंगाडे, जिल्हाध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे, जिल्हा सचिव विश्वनाथ निगळे, जिल्हा उपाध्यक्ष, कॉ. महेंद्र थोरात, खेड तालुकाध्यक्ष किसनराव ठाकूर, आयुब इनामदार, इम्रान इनामदार, अलीभाई सय्यद, खुशरोद्दीन मुजावर, मोहन घुटे, डॉ. जितेंद्र शिंदे इ. मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुब इनामदार, प्रस्ताविक डॉ.अमोल वाघमारे व आभार विश्वनाथ निगळे यांनी मानले.
हे ही वाचा :
डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ
कामगार संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; कोणते बदल होणार पहा !
भारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती; आजच करा अर्ज