पिंपरी चिंचवड : टाटा मोटर्स ट्रेनिग वसतिगृहाचे लोकप्रिय रेक्टर दत्तात्रय वामन देशपांडे (वय-90)यांचे कोल्हापूर येथे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सहा नातवंडे आणि एक पणतू असा परिवार आहे.
टाटा मोटर्स (पूर्वीची टेल्को) कंपनीने 1970 च्या दशकात देशातील आणि महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थ्यांना वाहन उद्योगात कुशल कारागीर निर्माण करण्यासाठी स्वतःचे ट्रेनिंग डिव्हिजन स्थापन केले.
ग्रामीण भागातील गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे शिक्षण देणाऱ्या टाटा उद्योग समूहाने शेकडो विदयार्थ्यांना निवासासाठी ट्रेनिंग डिव्हिजन वसतिगृह ही स्थापन केले. आशिया खंडातील सुप्रसिद्ध असलेल्या या ट्रेनिंग विभागात प्रवेश मिळवणे हा त्या काळात नशिबाचा भाग समजला जायचा.
त्या सर्व विद्यार्थ्यांचे पालन पोषण, क्रीडा, प्रशिक्षण यासाठी कंपनीने नामवंत अष्टपैलू प्रशिक्षक नेमले होते. पालकांपासून दूर राहणाऱ्या विदयार्थ्यांना देशपांडे सरांनी मायेचा ओलावा दिला होता. 1970 पासून 1992 पर्यंत टाटा मोटर्सच्या पिंपरी येथील वसतिगृहाची धुरा त्यांनी सांभाळली. भारतीय सैन्य दलातील ( तोफखाना विभाग) सेवा पूर्ण केली होती. 1969 मध्ये टाटा मोटर्स मध्ये वसतिगृहात रेक्टर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.
सुसंस्कृत, शिस्तबद्ध औद्योगिक प्रशिक्षणार्थींच्या (FTA) पिढ्या घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचे शेकडो विदयार्थी टाटा मोटर्स मध्ये विविध विभागात कुशल काम करू लागले. एक नवी औद्योगिक पिढी पिंपरी चिंचवड शहरात उदयास आली. देशपांडे यांच्या निधनाने शेकडो आजी माजी प्रशिक्षणार्थीना अतीव दुःख झाले आहे.
वसतिगृहाचे विद्यार्थी राहिलेले अविनाश आवटे म्हणाले, देशपांडे सरांनी वसतिगृहात आमचा मुलासारखा सांभाळ केला. त्यांनी आम्हाला परिसर स्वच्छतेचे महत्व शिकवले. सार्वजनिक आणि वैयक्तिक शिस्त आम्हाला शिकवली. सुसंस्कृत नागरिक अशी प्रतिष्ठा आम्हाला देशपांडे सरांच्या संस्कारामुळे मिळाली. ते आम्हाला पितृसमान वंदनीय होते.
तर क्रांतिकुमार कडुलकर म्हणाले, मी कोकणातील दुर्गम खेड्यातून शिकायला आलो. ज्ञानवंत व्हा, प्रज्ञावंत व्हा. कामामध्ये गुणवत्ता ठेवा, भरपूर व्यायाम करा. वेळेत अल्पोपहार आणि जेवण घ्या. लवकर झोपा आणि लवकर उठा, असे सर नेहमी सांगायचे. दिवाळीच्या सुटीत आम्ही काही मुले वसतिगृहात असायचो. सरांनी कधीच दिवाळीत सुटी घेतल्याचे मला आठवत नाही. वसतिगृहात सर आमच्यासाठी गोड फराळ द्यायचे, सर आमचे माय बाप होते.