Saturday, December 21, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख - क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर

विशेष लेख – क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वत्र प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. भीमराव यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील महू गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई होते. भीमरावांचे वडील रामजी सैन्यात नोकरी करत होते. 1894 मध्ये भीमरावांचे वडील रामजी सैन्यातील सेवानिवृत्त झाली. अन् अवघ्या दोन वर्षातच माता भिमाबाई चे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी भीमरावांच्या कठीण परिस्थितीत सांभाळ केला. रामजींना वाचनाची फार आवड होती.

व्यायामाने शरीर सदृढ बनते तर वाचनाने मस्तक सुधारते, मन खंबीर बनते यावर त्यांचा गाढ विश्वास होता. भीमरावांना वाचनाची प्रचंड आवड रामजींनी लावली. शालेय शिक्षण घेताना भीमरावांना महार जातीचे असल्याने अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. अनेक वाईट चालीरीतींची टक्कर द्यावी लागली. पण ते थांबले नाहीत. ही परिस्थिती शिक्षणाने बदलवण्याची त्यांनी खंबीरपणे ठरवले. अज्ञानाला शिक्षणाचा मंत्र देऊन सुरूंग लावण्याचे बाबासाहेबांनी ठरवले. वडिलांनी भीमरावांना शिस्त, प्रामाणिकपणा, चिकाटी, धैर्य आणि स्वावलंबनाचे धडे कुशलतेने दिले.

आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून रामजी नेहमी दक्ष असत. ते भिमाला चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय ठाई ठाई आढळते. त्यांच्याकडे मुंबईतील घरात 50 हजार पेक्षा जास्त पुस्तकाचे समृद्ध ग्रंथालय होते. त्यांनी अनहीलेशन ऑफ कास्ट, द बुद्ध अँड हिज धम्म, कस्ट इन इंडिया असे अनेक सरस महत्त्वपूर्ण ग्रंथांचे लेखन केले. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांचे लग्न सरळ, सुशील स्वभावाचा रमाबाई शी झाले. रमाबाई भिमराव यांच्यामागे प्रत्येक कार्यात सावलीप्रमाणे उभी राहिली. भीमरावांना विश्व पुरुष बनवण्यासाठी ती चंदनासम झिजली. भिमरावांकडे अलौकिक बुद्धिमत्ता, प्रचंड ग्रहणक्षमता, सागरी स्मरणशक्ती. अफाट कार्यश्रमता, अमोघ वाणी होती.

बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी 1913 मध्ये हुशार भीमरावांना शिष्यवृत्ती देऊन परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवले . अमेरिकेतील कोलंबिया विद्यालयात त्यांनी प्रवेश घेऊन उच्च शिक्षण सुरू ठेवले. तिथे अस्पृश्यता नसल्याने बाबासाहेबांना अमेरिकेचे अनोखे दर्शन घडले. पुढे लंडन विद्यापीठातील त्यांनी उच्च शिक्षण घेतले. भीमरावांच्या ठाई अंधाराला प्रकाशन फेकण्याची अनोखी ऊर्जा होती. विलायती तिथून परतल्यावर त्यांनी भारतात वकिली पत्करली. सामाजिक संस्थांची उभारणी केली.

वृत्तपत्राचे संपादन करून दलित, गरीब जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. दलित बांधवांच्या संघर्षांचे बीज पेरले. उच्च कोटीतील ग्रंथांची निर्मिती केली. समाजातील भेदभाव नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश, मनू मूर्ती स्मृती दहन, हिंदू कोड बिल अशी अनेक सामाजिक कार्य केली. हिंदू धर्मातील असमानता पाहून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. पुढे मग त्यांच्या अनेक अनुयायांनी हा धर्म स्वीकारला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग सर्वांनी भारताची राज्यघटना बनवण्याचे कठीण कार्य बाबासाहेबांना दिले. बाबासाहेबांनी ही संधी मानून भावी देशाची राज्यघटना समस्त देशवासीयांच्या हिताची बनवली. बाबासाहेब युगनायक होते युग निर्माते होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. तसेच असामान्य प्रतिभावंत लेखक होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. त्यांनी मूकनायक बहिष्कृत भारत सारख्या इतर उत्तम वृत्तपत्रांचे संपादन केले. त्यांना प्रत्येक क्षेत्रात परिपूर्ण ज्ञान माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक व पत्रकारिता कायदा अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांनी दीनदलितांच्या, श्रमिक, गोरगरीब, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला.

वर्षानुवर्षे गुलामगिरीत अज्ञान अडकलेला मागासवर्गीय समाजाचा क्रांतीचे बीज पेरले. स्त्री वर्ग, शेतकरी, पददलित, मजूर समाजाला समतेची वाट दाखवून दिली. अखेर या विश्व पुरुषांनी 6 डिसेंबर 1956 चाली अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब एक महामानव नाहीत तर दलित, गोर-गरीब, वंचित मूक समाजाचा ते विचार होते. माणसाला माणूस पण मिळवून देणारे ते अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. सध्याच्या काळात आपण भारतवासीयांनी जर आंबेडकरांचे विचार आचरणात आणले तर नक्कीच भारत देश प्रगतीपथावर झेप घेईल हे मात्र नक्की…..

– रत्नदिप सरोदे, बारामती


संबंधित लेख

लोकप्रिय