Saturday, October 5, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : अज्ञानाच्या झोपेतून जागवणारी वासुदेव संस्कृती टिकवली पाहिजे - क्रांतिकुमार...

विशेष लेख : अज्ञानाच्या झोपेतून जागवणारी वासुदेव संस्कृती टिकवली पाहिजे – क्रांतिकुमार कडुलकर

तो स्वतःहून कोणाकडे काहीही मागत नाही, पहाटे राम प्रहरी माणूस गाढ निद्रेत असताना ‘‘वासुदेव आला हो, वासुदेव आला, सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला, वासुदेव आला हो, वासुदेव आला,’’ हे गाणं गात तो दारो दारी फिरतो. तो ग्रामीण भागातील वस्ती वस्ती तुन फिरत असतो. कधी तो एकटाच फिरतो, त्याच्या गाण्यातील शब्दामध्ये अनाकलनीय संदर्भ असतात. तो या विश्वातील क्षणभंगुर मानवी जीवनाचे शाश्वत स्वरूप सांगतो. त्याचे दर्शन मनाला आनंद देत असते.

शहरातील गृहसंकुलाच्या परीसरात पहाटे पहाटे त्याच्या गाण्याचे पडसाद सर्वत्र पसरतात. रंगीबेरंगी पोशाखातील लोभस ध्यान डोळ्यांसमोर उभं राहतं. वासुदेव म्हणजे अंगभरून पोशाख, हातात टाळ-चिपळ्या, डोक्‍यात विविधरंगी कवड्यांच्या माळांनी गुंफलेला मोरपिसाचा टोप, कपाळी गंध अशी वेशभूषा असलेला वासुदेव आज दोन वर्षांनी परत मला दिसला.

‘अवो शंकराच्या नावानी, अवो पांडुरंगाच्या नावानी..

सकाळच्या रामपार्‍यामंदी, वासुदेवाचे लेकरू आलं..’

धर्म पावला, दान पावलं असं म्हणत बासरी आणि टाळ वाजवत भल्या पहाटे नाचत येणारा वासुदेव आता दिसेनासा झाला आहे. ‘दात्याला दान पावलं’ म्हणणारी वासुदेवाची गाणी अखेरच्या घटका मोजत आहेत.

जुन्या काळात मराठी मुलखातील खेडोपाडी येणारी पहाट मोठी देखणी असायची. घराघरातून जात्यावरची गाणी म्हणत धान्य दळणार्‍या महिला, गल्लीगल्लीत खांद्यावर कावड घेऊन आडावरून पाणी आणणारी गडीमाणसं अन् त्याच वेळी डोक्यावर मोरपिसांची उभट टोपी घातलेला, अंगात विशिष्ट प्रकारचा झगा, पायात घुंगरू, हातात टाळ आणि बासरी घेऊन गाणं म्हणत नाच करणारा वासुदेव दिसायचा. अलीकडच्या काळात त्याचे दर्शन दुर्लभ होत आहे.

अंगणात वासुदेव आला म्हणजे भाग्याची गोष्ट मानली जात असे. कारण त्या रूपाने श्रीकृष्ण घरी आल्याचा आनंद होत असे. त्याचे दर्शन घडले की लहान मुले आनंदून जात. बायका माणसे सुपातून जोंधळे घालत आणि दान करत. पुरुष माणसे दुंडा पैसा देऊन त्याला नमस्कार करत. वासुदेवही दान पावलं म्हणत अंगणात नाच करी. सारे अंगण जसे काही समाधानाने आनंदून जाई.

 

लोककला, लोकसंस्कृती टिकवणारी वासुदेव ही एक भटकी जमात आहे. वासुदेवाचा उल्लेख विविध ग्रंथामध्ये सापडतो. मराठी संस्कृतीतील वासुदेवांची परंपरा सुमारे हजार-बाराशे वर्षे जुनी असावी, असा अंदाज आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या साहित्यात वासुदेवावरील रूपके आढळतात. परंतु एकनाथ महाराजांनी त्याला आणखी प्रसिद्धीच्या झोतात आणले.

संपूर्ण महाराष्ट्रात वासुदेव ही पारंपरिक भटकी जमात आहे. महाराष्ट्रातील धार्मिक भिक्षेकरी जमात. धार्मिक वृत्तीने भिक्षा मागणे हा या जमातीचा उपजीविकेचा मुख्य मार्ग आहे.

वासुदेवाची गाणी, कृष्णचरित्र, भक्तीमहिमा प्रपंचनीती, कौटुंबिक भावबंध, सुबोध भाषेत वेदान्त स्पष्ट करणारी अशा विविध विषयावर असतात. जीवनाला आवश्यक सुसंस्कृत जीवनाची महती सांगणाऱ्या वासुदेवाला स्वतःचे घर नसते, ते महाराष्ट्रातील विविध प्रांतात पीकपाणी, सुगीच्या दिवसात घरोघरी पहाटे फिरतात.

 

विदर्भ, मराठवाड्यातील रानोमाळ ठिकाणाहून ते पश्चिम महाराष्ट्र, कोकण पट्ट्यात जातात. साताऱ्यातील हेळवाकच्या जंगल कडेकपरीतून तो कोकणात उतरतो. दसरा, दिवाळी पासून यांचे दर्शन दिसते.

‘रामहरी भगवान, भजावे मुखी राम, खोटी वासना सोडूनी द्या, पन देवाचे चरण धरा, आई बाप घरची काशी मानुनी त्यांचे चरण धरा..’, असे मानवी जीवनाला आवश्यक अशा उत्तम प्रकारच्या सद्विचारांचीही महती सांगितली जाई. आता या वासुदेवांचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. वासुदेवाचं रूप घेऊन दान पावलं म्हणत दान मागणारी परंपरा काळाच्या ओघात लुप्त होऊ पाहत आहे.

महाराष्ट्रात पांगूळ, भूते, मसणजोगी, गोंधळी, गोसावी अशा अनेक परंपरा आहेत. ऐतिहासिक काळात वासुदेव  हेरगिरी,खबरी पोचवणे, गुप्त माहिती पोचवण्याचे काम करत. वासुदेव शिवरायांच्या काळात हेरगिरी करून शत्रू पक्षाची माहिती राज्यांना देत असत. सर्व वासुदेव कृष्णाचे भक्त असून,कृष्णाने काम सांगितले, त्याची आठवण म्हणून त्यांनी त्याचा वेश व नावही त्याचेच घेतले. सर्व वासुदेव मराठी भाषा बोलतात. वासुदेव जातीने मराठा श्रेणीतले आहेत. मराठा वासुदेव, जोशी वासुदेव, भ्रीडी वासुदेव, गोंधळी वासुदेव असे जातप्रकार त्यांच्यात आढळतात.

 

शहरातील मोकळ्या जागेवर वासुदेव कुटुंब कबिल्यासह पाल ठोकून रहात आहेत,कधी ते एखाद्या झोपडपट्टीत राहतात. ही परंपरा टिकावी असे त्यांच्या मुलांना वाटत नाही, बारा बलुतेदार, तेरा बलुतेदार ही पूर्वीची समाज अवस्था होती, आता संपुष्टात आली आहे. प्राचीन संस्कृतीचे, लोककलेचे जतन करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असते. या कलेला राजाश्रय मिळाला तर वासुदेव पर्यावरण, परिसर स्वच्छता, आरोग्य अभियानामध्ये सुंदर जनजागरण करतील असे वाटते.

व्यापारी जगातील नव्या वळणावर ग्रामीण, शहरी भागातील जनजीवन अर्थसंस्कृतीच्या चक्रामध्ये गुंतले आहे. गतकाळातील या लोकसंस्कृतीच्या इतिहासाकडे बघायला, नव्या पिढीला वेळ नाही आता आणि ही एक वासुदेवाची ही परंपरा लुप्त होणार आहे, त्यांची मुले सुद्धा हा भटका प्रवास सोडून द्यायला लागली आहेत.

जोपर्यंत पंढरीची वारी सुरू आहे तोपर्यंत वासुदेव त्या वारीमध्ये दिसेल बाबा असे मला भेटलेला वासुदेव म्हणाला.

परंपरा सुरू राहावी, वासुदेवाची परंपरा आमच्या चौथ्या पिढीपासून आजतागायत सांभाळली आहे. आमचा समाज पश्चिम महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात आढळतो. दसरा दिवाळी नंतर उन्हाळा संपेपर्यंत वासुदेव महाराष्ट्रभर फिरत असतात. या वासुदेव संस्कृतीला टिकवण्यासाठी त्यांना मान मरातब देऊन त्यांना मुक्त हस्ते अन्नधान्य द्यावे.

बदलत्या काळात या समाजातील नव्या पिढय़ांनी नवीन व्यवसाय स्वीकारले आहेत. या समाजातील नव्या पिढीला दारोदार फिरून दान मागण्याची लाज वाटते. आता पूर्वीसारखे दानही मिळत नाही. त्यामुळे या परंपरा नष्ट होऊ लागल्या आहेत. या लोकपरंपरांचे जतन होणे गरजेचे आहे. ज्ञानाची आणि दानाची संस्कृती वासुदेवाचं अस्तित्व टिकवू शकते. तो येईल तेव्हा सुपाने धान्य देऊन त्याचे गाणे ऐकत राहू !

– क्रांतिकुमार कडुलकर, पुणे


संबंधित लेख

लोकप्रिय