झटपट प्रसिद्धी मिळवण्याचा मार्ग म्हणजे सोशल मीडिया. सध्या तरुण-तरुणींमध्ये छोट्या-छोट्या रिल्स बनवून अपलोड करण्याचे फॅड आले आहे. परंतु या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अनेकदा नोकरीवरही गदांतर येतंय.असाच प्रकार धाराशिव जिल्ह्यातील कळंब आगारातील एका महिला कंडक्टरसोबत घडला आहे. परिवरन महामंडळाच्या खाकी वर्दीमध्ये व्हिडीओ अपलोड करणे महिला कंडक्टरला महागात पडले आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप ठेवत महिला कंटक्टरसह तिच्या साथिदाराला निलंबित करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर छोटे-छोटे व्हिडीओ अपलोड करून रातोरात स्टार झालेले व नशीब पालटलेले किस्से आपण पाहिले आहेत. यात अनेक जण मालामाल झाले आहेत. परंतु सोशल मीडियावर परिवहन महामंडळाच्या खाकी वर्दीवरील व्हिडीओ तयार करणे कळंब बस आगारातील महिला कंडक्टर मंगल सागर गिरी व तिचा सहकारी कंडक्टर कल्याण कुंभार यांना महागात पडले.
कळंब बस आगारातील महिला कंडक्टर मंगल गिरी हिचे व्हिडीओ सोशल मिडियावर धुमाकुळ घालत आहेत. विविध प्रकारच्या व्हिडीओमुळे मंगल गिरी चर्चेत आली होती. मंगल हिने चक्क ऑन ड्युटीवरील खाकी वर्दीत बस चालवतानाचे, तसेच प्रवाशांचे तिकीट काढत असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले होते. यात तिला तिचा सहकारी कल्याण कुंभार यानेही मदत केली. त्यामुळे दोघांनाही निलंबित करण्यात आल्याचे कळंब आगाराचे व्यवस्थापक मुकेश कोमटवार यांनी सांगितले.