सोशल मीडियाचा वाढता प्रभाव प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालत आहे. आज व्हाट्सएप, इन्स्टाग्राम, फेसबुक सारख्या माध्यमातून दूरवरच्या अनोळखी व्यक्तींसोबत मैत्री होत आहे. पूर्वी सोशल मिडियाच फॅड फक्त शहरापूरते मर्यादित होते. मात्र आज हे फॅड खेडोपाडी जाऊन पोहचले आहे. आदिवासी भागात नेटवर्क नसल्याने इंटरनेट किंवा फोन सुविधांचा अभाव होता. मात्र आदिवासी भागात रेंज आली आणि माणसातील माणुसकी मात्र रेंजच्या बाहेरच गेली. गुरांमागे खेळाचे रंगणारे डाव बंद झाले. अन् हातात मोबाईल घेऊन तासन तास गुडघ्यात डोकं घालून बसणारी बुजगावणी तयार झाली. प्रत्येकाच्या सुख दुःखात जाणारे लोक आता मोबाईल वरूनच सांत्वन व भावपूर्ण श्रद्धांजली तसेच अभिनंदनाचे मॅसेज करायला लागले.
आदिवासी भागात तर सोशल मीडियाचं वार मोठ्या प्रमाणात घोंगावत आहे. त्यात कोरोना आला आणि ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाली. ऑनलाईन शिक्षणामुळे आदिवासी भागातील अनेक पालकांनी आपल्या मुली व मुलांना अभ्यास करण्यासाठी अँड्रॉईड मोबाईल घेऊन दिले. आपल्या मुलांना अभ्यास करता यावा. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या हेतूने पालकांनी रात्रीचा दिवस करून, अतोनात कष्ट करून मोबाईल दिला खरा. पण ज्या उद्देशाने मोबाईल पालकांनी मुली – मुलांच्या हाती दिला तो उद्देश साध्य झाला असे मला तरी वाटत नाही. या उलट अनेक विद्यार्थी ऑनलाईन तासाच्या नावाखाली कित्येक वेळ मोबाईल हातात घेऊन नको त्या गोष्टी करत आहेत.
पूर्वी अठरा ते वीस वर्षाच्या मुला – मुलींना ट्विटर, फेसबुक या सोशल मीडियाच्या अँप बाबत जास्त माहिती अवगत नव्हती. मात्र आज आदिवासी भागातील इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला – मुलींची व्हाट्सएप, इन्स्टाग्राम, फेसबुक यावर प्रोफाईल पाहायला मिळत आहेत. टिकटॉक नंतर इन्स्टाग्रामवर लहान वयातील मुलं – मुली Reels बनवत आहेत. ज्या वयात अभ्यास करून करिअर घडवणे अपेक्षित आहे. अश्या वयात मुलांच्या मनात सोशल मीडियाने घर केलं आहे.
रात्री बेरात्री लाईव्हच्या माध्यमातून अनोळखी लोकांच्या संपर्कात येणारी अज्ञान मूल – मुली कालांतराने नानाप्रकारे फसवणूक झाल्याने विविध गैरप्रकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. खरं तर पालकांनी आपला पाल्य काय करत आहे याबाबत माहिती घेतली पाहिजे. त्याच्याशी मैत्रीपूर्वक संबंध ठेऊन त्याच्याशी हितगुज केली पाहिजे. पालकांनी लवकरच आपल्या पाल्याला सोशल साईड व अँपच्या जाळ्यात अडकवणाऱ्या राक्षसाच्या हातातून वाचविले पाहिजे. सोशल मीडिया जेवढी चांगली आहे तेवढीच घातक देखील आहे. त्यामुळे बदलत्या काळाबरोबर आपण बदलले पाहिजे हे देखील महत्वाचे आहे. मात्र सोशल मीडियाचा अति वापर टाकला पाहिजे.
लहान मुलांना व्हाट्सएप, इन्स्टाग्राम, फेसबुक या साधनापासून चार हात लांब ठेवणे आज गरजेचे झाले आहे. आदिवासी भागातील अनेक लोक नेटवर्क आल्याने खुश आहेत. मात्र वाढते गैरप्रकार पाहता अनेक पालकांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.
✍? किरण दिलीपकुमार म्हसकर
जुन्नर
प्रा.डॉ.भिमा केंगले यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ प्रदान
जुन्नरमधील बिबट सफारी पार्क स्थलांतरास विरोध, माजी आमदार शरद सोनवणे करणार आमरण उपोषण
कल्याण-मुरबाड-माळशेज रेल्वे मार्गासाठी लागणारा आर्थिक भार राज्य सरकार उचलणार !