Thursday, September 19, 2024
HomeNewsहोय ते गद्दारच ! बुडाखाली चिकटलेली मंत्रिपदे काही काळासाठी पण गद्दारीचा शिक्का...

होय ते गद्दारच ! बुडाखाली चिकटलेली मंत्रिपदे काही काळासाठी पण गद्दारीचा शिक्का कायमचा : उद्धव ठाकरे

असंख्य अडथळ्यांवर ‘विजय’ मिळवत शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा शिवतीर्थावर गर्दीचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडत अत्यंत शिस्तीत मात्र प्रचंड जोश आणि जल्लोषात साजरा झाला.

या मेळाव्याची ‘ऐतिहासिक’ दसरा मेळावा अशीच नोंद इतिहासाला घ्यावी लागेल इतका भव्यदिव्य असा हा मेळावा पार पडला. अति विराट अशा या सभेमुळे मुंबईत निष्ठेचं आणि खऱ्या हिंदुत्वाचा भगवं वादळ आल्याप्रमाणेच भासत होतं. ‘जय भवानी जय शिवराय’, ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता. सगळ्यांचे कान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारधनाकडे लागले होते. प्रत्येकजण उद्धव ठाकरे आज काय बोलणार हे ऐकण्यासाठी उत्सुक होता. शिवसेना नेते, उपनेते यांच्या दमदार भाषणानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यासपीठावर बोलण्यास उभे राहिले तेव्हा समोर जमलेला शिवसैनिकांचा निष्ठेचा सागर उसळू लागला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावलेल्या प्रत्येक फटकाऱ्यावर शिवसैनिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत होता. हशा, टाळ्या, शिट्ट्या अशा प्रतिसादात उद्धव ठाकरे यांनी तडाखे बंद भाषण करत ‘मिंधे गट’, शिंदे फडणवीस सरकार यांच्यावर आसूड ओढले आणि त्यासोबत खऱ्या हिंदुत्वाचा स्वरूप मांडलं.
‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनींनो आणि मातांनो…’ या चैतन्य जागवणाऱ्या वाक्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. उद्धव ठाकरे म्हणाले की आपण आजपर्यंत अनेक मेळावे पाहिले पण असा अभूतपूर्व मेळावा पहिल्यांदाच झाला. तुमच्या प्रेमामुळे मी भारावलो आहे, त्यामुळे बोलायला खूप आहे, पण किती बोलता येईल, हा प्रश्न आहे. हे प्रेम विकत मिळत नाही हे ओरबाडून घेता येत नाही. ही माझ्या जिवाभावाच्या शिवसैनिकांची गर्दी आहे. तुमचे प्रेम आणि आशिर्वाद याच्या बळावर आपण अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. ते गद्दार असून आपण त्यांना गद्दारच म्हणणार, त्यांचा गद्दारीचा शिक्का या जन्मी पुसता येणार नाही. गद्दारांनी गद्दारी केली. मंत्रिपद तुम्हाला काही काळापुरती मिळाली आहेत मात्र गद्दारीचा शिक्का पुसता येणार नाही. असा घणाघात उद्धव ठरे यांनी बंडखोर आमदारांवर केला.

पुढे ते म्हणाले की कोणताही अनुभव नसताना मुख्यमंत्री पदाचा कारभार मी केला. डॉक्टरांनी मला वाकायची परवानगी दिली नाही तरीही तुम्हाला नतमस्तक होऊन नमस्कार करतो. अनेकांना शिवसेनेचं काय होणार असा प्रश पडला होता. मात्र मला चिंता नाही. ही गर्दी बघून गद्दारांचे कसे होणार, असा प्रश्न आता पडतो आहे. इथे एकही माणूस भाड्याने आणलेला नाही. एकनिष्ठ शिवसैनिक माझ्या समोर बसले आहेत. आपल्या मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे. जसा काळ बदलतो तास रावण सुद्धा बदलतो. या वेळचा रावण वेगळा आहे. आता 50 खोक्यांचा खोकासूर आहे. खोकासूर आणि धोकासूर कट करणारे कट्टप्पा असून ते माझ्याविरोधात कट करत होते. मात्र हा उद्धव ठाकरे आहे. भवानीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. तुम्ही माझ्याशी पंगा घेतला आहे, देव तुमचा भलं करो.

माझ्यावर शस्त्रक्रिया झाली त्यानंतर माझे शरीर निश्चल झाले होते, त्यावेळी कटाप्पा कट करत होते. भाजपने पाठीत वार केला म्हणून आपण महाविकास आघाडी केली होती. मी जर हिंदुत्व सोडले असेल तर तुम्हीच पुढे येऊन सांगा. अमित शहा बोलले असे काही ठरले नव्हते, मात्र मी छत्रपती शिवराय आणि आईवडिलांच्या साक्षीने सांगतो, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचेच ठरले होते. स्वतःच्या बापाच्या नावाने मते मागण्याची ताकद नाही. बाप चोरणारी एवलाद आहे ती. असा घणाघात ठाकरेंनी केला

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आपल्यात नाहीत, मात्र ते त्यांच्या नावाने मते मागत आहेत. माणसाची हाव किती असते. शिवसेना प्रमुख म्हणून मिरवायची तुमची लायकी नाही. आनंद दिघे यांना आता आठवले. मात्र त्यांनी लक्षात ठेवावं आनंद दिघे 20 वर्षे एकनिष्ठ राहून भगव्यातून गेले. असे ठाकरे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांना कायद्याचे ज्ञान आहे, ते सभ्य गृहस्थ आहेत. आपण त्यांना टोमणे मारत नाही. देवेंद्र फडणवीस सभ्य माणूस आहे यात टोमणा मारण्यासारखं काय आहे. मी पुन्हा येईन असं ते म्हणाले होते. मात्र ते दीड दिवसांसाठी आले आणि आता मनावर दगड ठेवत उपमुख्यमंत्री झालेत. फडणवीस म्हणतात की कायद्याच्या चौकटीत राहा. कायदा आम्ही पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची, हे चालणार नाही. त्यांचे आमदार हात पाय तोडायची भाषा करतात. कोणी खुलेआम बंदूक काढतो. तर कोणी चुनचुनके मारेंगे म्हणतो, अशा वेळी कोठे आहे त्यांचा कायदा. शिवसैनिक शांत आहेत, त्यांना शांत राहू द्या, त्यांना डिवचू नका. मी शिवसैनिकांवरील अन्याय सहन करणार नाही. असा इशारा ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला.

पुढे ते म्हणाले की शिवसेना कशी पुढे न्यायची, हिंदुत्व कसे सांभाळायचे, ते आम्हाला शिकवू नका. आम्ही आजही हिंदू उद्याही हिंदू आणि मेल्यानंतरही हिंदूच. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या वाढदिवसाला जाणारे तुमचे नेते, तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार. पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाला न बोलावता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार. मेहबुबा मुफ्ती सोंबत युती करणारे आम्हाला हिंदुत्व शिकवणार. हिंदुत्व करत करत तुम्ही गाईवर बोलता, पण आता महागाईवर आणि बेरोजगारीवर बोला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे दत्तात्रय होसबाळे यांनी संघाला आणि भाजपला आरसा दाखवण्याचे काम केले आहे, त्यांचे अभिनंदन.

कोंबडी चोरावर आणि बाप चोरावर मला या मेळाव्यात बोलायचं नाही. कारण या दसरा मेळाव्याची पवित्र परंपरा आहे. याला विचारांचे पावित्र्य आहे. शिव्या देणे सोपे असते, परंतु विचार देणे कठीण असते. मी विचार देण्यासाठी आलो आहे. मी विचारांची परंपरा पुढे नेतोय. देशाची आर्थिक स्थिती ढासळत आहे. रुपयाचा भाव आज डॉलरच्या तुलनेत किती आहे? रुपया घसरतो तेव्हा देशाची पत देखील घसरते, असे ठाकरे म्हणाले.

अमित शहा यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की. अमित शहा हे आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री आहेत हेच कळत नाही. ते मुंबईत येऊन शिवसेनेला जमीन दाखवायची भाषा करतात. त्यांना मला सांगायचे आहे की आम्ही जमीवरचेच आहोत. तुमच्यात हिम्मत आहे तर पाकव्याप्त काश्मीरची जमीन परत आणा, ती जमीन जिंकून दाखवा आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. तिकडे चीन अरुणाचल प्रदेश, लडाख, लेहमध्ये घुसतोय, तिथे लक्ष द्या.

महाराष्ट्रातले प्रकल्प गुरताला चाललेत आणि हे मिंधे मान खाली घालून बसले आहेत. राज्यातल्या नव्या सरकारला 100 दिवस झाले आहेत. मात्र त्यातले 90 दिवस ते दिल्लीला गेले होते. पुष्पा आला होता तो म्हणायचा ‘झुकेगा नही साला’ आणि मिंधे गट म्हणतोय ‘ऊठेगा नही साला’ असे म्हणत ठाकरेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला.

माझे सगळ्या हिंदुत्ववाद्यांना आव्हान आहे तुम्ही एका व्यासपीठावर यावे, तुम्ही तुमचे हिंदुत्व सांगा, मी माझे हिंदुत्व सांगतो. या देशावर प्रेम करणारा, मुसलमान असला तरी तो आपला आहे. आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही. तुम्ही तुमचा धर्म घरात ठेवा तो घराबाहेर आणू नका. तुमच्या हातात जपमाळ असेल आणि समोर स्टेनगन घेतलेला दहशतवादी असेल, तर तुमच्याही हातात स्टेनगन असायला हवी. असे ठाकरे म्हणाले.

सध्याचे वातावरण पाहता देशात लोकशाही शिल्लक आहे की नाही हा प्रश्न पडतो. कारण मागे जे. पी. नड्डा म्हणत होते की सगळे पक्ष संपवणार आणि भाजप एकच पक्ष राहणार. म्हणजे आपला देश हुकूमशाहीकडे जात आहे. भाजप आपली भारत माता हुकूमशाहीकडे नेत आहे. त्यामुळे जे जे देशप्रेमी आहेत, त्यांनी देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी पुढे यायला हवे. सर्वांनी एकत्र येत देशाला वाचवण्याची गरज आहे. असे ते म्हणाले.

सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत गेले होते. तेव्हा तेथील मुसलमानांनी म्हटले की भागवत राष्ट्रपिता आहेत. अंकिता भंडारींची हत्या भाजप नेत्याच्या रिसॉर्टमध्ये झाली होती. तिचा मृतदेहसुद्धा तिथेच सापडला. अंकिताच्या मारेकऱ्यांवर कारवाई का होत नाही, तिच्या मातेचा आक्रोश ऐकायला येत नाही का? बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना गुजरात सरकारने तुरुंगातून सोडून दिले, त्यांचा सत्कार करण्यात आला. हे देशात काय सुरू आहे. असा प्रश्न ठाकरेंनी केला.

ईडी कार्यालयात गेल्यावर त्यांच्या अंगात हिंदुत्वाच्या घागरी फुंकायला लागतात. इतिहासात तोतयाचे बंड आहे. आताही काही तोतये आम्हीच बाळासाहेब असल्याचे भासवत आहेत. हे तोतये आपली शिवसेना पळवायला आले आहेत, तुम्ही पळवायला देणार आहात का? आपली पंरपरा असलेले हे मैदान त्यांना मिळू द्यायचे नव्हते, मात्र, न्यायालयामुळे ते मिळाले. आता त्यांना धनुष्यबाणा पाहिजे, बाळासाहेब पाहिजे, आपली शिवसेना पाहिजे. हिंमत असेल तर एकाच व्यासपीठावर या, भाजपची स्क्रिप्ट न घेता बोलून दाखवा असे आवाहन ठाकरेंनी बंडखोरांना दिले.

पुढे ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत असताना औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द आपण पाळला आहे. हे प्रस्ताव मांडल्यावर दोन्ही पक्षाने त्याला सहमती दिली. त्यांच्यासोबत आम्ही हिंदुत्व वाढवत होतो. मी लढणाऱ्या पित्याचा लढणारा पुत्र आहे. मी निखाऱ्यावरून आणि काटेरी मार्गावर चालणारा आहे, यासाठी मला तुम्ही साथ देणार आहात, असा सवाल ठाकरेंनी केल्यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी हात उंचावून आपला पाठिंबा उद्धव ठाकरेंना दर्शविला. एक चांगले झाले, आता बांडगूळ गळून पडले आहेत. आता या खोकासूराचा अंत होणार आहे, असा विश्वासही ठाकरेंनी व्यक्त केला. भाषण संपल्यानंतर शिवतीर्थावर 50 खोक्यांच्या रावणाचे दहन करण्यात आले.

सोर्स सामना

संबंधित लेख

लोकप्रिय