पुणे : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे उद्घाटन 3 एप्रिल रोजी पुणे येथे होत आहे, या निर्णयाचे सिटू प्रणित महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेने स्वागत केले आहे.
या संदर्भात सिटू चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ. डी एल कराड यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे कि, ऊस तोडणी मजुरांच्या बाबतीत फक्त मजूर वाढीचे निर्णय करून त्यांच्या जीवनाला स्थैर्य येणार नाही, त्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणे आवश्यक आहे, अशी मागणी सिटू प्रणित महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेने केली व प्रत्येक कराराच्या वेळेला याबाबत पाठपुरावा केला. त्यावेळेला अन्य ऊसतोड कामगार संघटनांनी मागणी गांभीर्याने घेतली नव्हती व साखर संघानेही सकारात्मकता दाखवली नव्हती. नंतरही सिटू संघटनेने ही मागणी लावून धरली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पंकजा मुंडे सत्तेत असताना संघटनेत यांच्याकडेही पाठपुरावा केला होता पण अपेक्षित प्रत्यक्षात कारवाई झाली नाही. मागील मजूर वाढीच्या कराराच्या वेळेला याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व धनंजय मुंडे यांनी ठोस आश्वासन दिले होते.
लॉकडाऊन व करोना काळात ऊस तोडणी कामगारांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या व त्या काळातही संघटनेने समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे व खासदार शरद पवार यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा केला होता. आता शेवटी या महामंडळाचे कार्यालय सुरू होत आहे ही अत्यंत समाधानाची व आनंदाची बाब असल्याचे डॉ. कराड यांनी म्हटले आहे.
या कार्यालयामार्फत आणि महामंडळामार्फत साखर कारखान्यांच्या सहकार्याने शंभर टक्के ऊस तोडणी कामगार, मुकादम, वाहतूकदारांची नोंदणी करावी. त्यांना ओळखपत्र द्यावेत व बांधकाम कामगारांच्या धर्तीवर कल्याणकारी योजना व सामाजिक सुरक्षा लागू कराव्यात अशी मागणी सिटू प्रणित महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेने केली आहे. तसेच, महामंडळाला ऊस तोडणी कामगारांना न्याय मिळावा यासाठी संघटना सर्वतोपरी सहकार्य करेल असेही म्हटले आहे.