Friday, November 22, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : खोट्या विचारांच्या पिकावर खऱ्या विचारांची फवारणी

विशेष लेख : खोट्या विचारांच्या पिकावर खऱ्या विचारांची फवारणी

मनोहर कुलकर्णी (भिडे) यांनी नुकतेच देशातील दोन्ही माहात्म्यांबद्दल मनातील गरळ ओकली. महात्मा गांधींचा बाप मुसलमान होता आणि महात्मा फुले ब्रिटिशांचे एजंट होते असे ते बोलले. महात्मा फ़ुलेंबद्दल तर अतिशय खालच्या भाषेचा त्यांनी वापर केला. असो.. शेवटी ते त्यांचे विकृत संस्कार आहेत.

या देशात मोदी चोर है असं म्हंटल की विरोधी पक्षाच्या खासदाराला दोन वर्षांची शिक्षा होते, त्याची खासदारकी रद्द होते. पण ज्यावेळी देशाच्या राष्ट्रपित्याचा बाप बदलला जातो, त्याच्या आई चे चारित्र्यहनन होते त्यावेळी मात्र अशा विकृत व्यक्तीला सरकारी संरक्षण दिले जाते. 

आपण भिडेंच्या दोन्ही आरोपांचा समाचार घेऊ. भिडेंनी कुण्या एका लेखकाचा हवाला देत महात्मा गांधींचे वडील मुस्लिम होते असे सांगितले. खोटी माहिती समाजात पसरविण्यात यांचा हातखंडा आहे. ज्या पुस्तकातील मजकूर हे भिडे वाचून दाखवत आहेत त्या पुस्तकात या माहितीचा कुठलाही संदर्भ दिलेला नाही. बाजारगप्पांवर आधारित माहिती लेखकाने पुस्तकात दिली आहे. या पुस्तकावर बंदिसुद्धा आहे. लेखकाने लिहिताना काय संदर्भ दिला याच्याशी भिडेंना काहीही घेणे-देणे नाही. याच हिशोबाने रामचंद्र नारायण लाड यांचे ‘मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपोस किंमतीचे पेशवे’ या पुस्तकाचे देखील वाचन भिडेंनी असेच सार्वजनिक रित्या करायला पाहिजे. त्यातून पेशव्यांच्या वडिलांचा शोध भिडेंना नक्कीच लागेल. कारण गांधींचे वडील शोधण्यापेक्षा भिडेंच्या जवळच्या पेशव्यांचे वडील शोधणे अधिक आवश्यक आहे. 

ही पुस्तकातील माहिती सांगतांना भिडेंचा जोर असा होता की, मुस्लिम म्हणजे तुच्छ वर्ग. (तसे ते प्रत्यक्ष अनेकदा बोलले सुद्धा) आणि समजा गांधींचे वडील मुस्लिम असते ही तरी मग काय बिघडले असते?  मुस्लिम म्हणजे काय राक्षस आहेत काय? मुस्लिम जर इतकेच वाईट आहेत, देशद्रोही आहेत आणि ते जर लव्ह-जिहाद करतात तर भाजपचे केंद्रीय संघटन मंत्री रामलाल गुप्तांची भाची श्रेया गुप्ता ने मुस्लिम युवक फैजान करीम सोबत लग्न केले. भाजपाचेच दिग्गज नेता सुब्रमण्यम स्वामींची मुलगी सुहासिनी ने नदीम हैदर सोबत लग्न केले आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी ह्यांची पत्नी सीमा आणि सून सुमाना दोन्ही हिंदू आहेत. भाजपचे मोठे नेते, माजी मंत्री सैय्यद शाहनवाज हुसैन यांच्या पत्नी रेणू ह्या हिंदू आहेत. या मुस्लिमांना वरील हिंदूंनी का मुली दिल्या? यावर जरा बोला? हा तुमच्या नजरेत लव्ह जिहाद नाही का? केवळ गरिबांवरच तुम्ही लोक मर्दुमकी गाजवणार?

व्यक्तीचे श्रेष्ठपण आपण कशावर ठरवणार? धर्मावर की कर्तृत्वावर? ज्यावेळी मोगल या देशात आले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत स्त्रिया आणल्या नव्हत्या. मग मोघलांना कुणी स्त्रिया दिल्या? हिंदूंनीच ना? पण त्याबद्दल हे भिडे बोलणार नाहीत. गांधींच्या अहिंसेने जर भारतीय षंढ बनले तर गांधी भारतात येत आधी म्हणजे 1915 च्या आधीच भारतातील हिंदूंनी ब्रिटिशांना का हाकलून लावले नाही? त्या आधी 600 वर्ष मोघलांना का हाकलून लावले नाही?  तेव्हा तर गांधींची अहिंसा नव्हतीच, तेव्हा होती महान भारतीय संस्कृती. पण याबद्दल ते बोलणार नाहीत. कारण भिडेंनाही माहीत आहे गांधींच्या मागे जितके हिंदू अनुयायी होते तितके कधीच कोणत्या जिवंत माणसाच्या मागे नव्हते. 

गांधींच्या वडिलांनी मुस्लिम व्यक्तीकडून पैसे घेतले म्हणून जर त्यांच्या आईला मुस्लिमाकडे राहावे लागले तर मग सावरकरांनी पण शंकरलाल कनोजिया यांच्याकडून पैसे घेतले होते काय? कारण सावरकरांची पत्नी सुद्धा या शंकरलाल कनोजिया सोबत पळून गेली होती. याबद्दल भिडेंचे मत ऐकायला लोकांना नक्कीच आवडेल.

धर्म बदलला म्हणून काय महात्मा गांधींच्या कार्याचे महत्व कमी होते? एखादी वेश्या भगिनी जर विदेशात जाऊन देशासाठी हेरगिरी करते आणि जीवावर उदार होऊन तेथील सगळी माहिती आपल्या देशासाठी आणते. दुसरी एखादी पतिव्रता भगिनी कुरुलकर सारखी आपल्या देशाची माहिती शत्रू राष्ट्रांना पुरवते मग या दोघींमध्ये राष्ट्रभक्त कोण? आणि गद्दार कोण?

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील मुस्लिम क्रांतिकारक अशफ़ाक उल्ला खान यांनी स्वातंत्र्यलढ्यातीलच ’काकोरी कांड’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या घटनेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला चालवला आणि 19 डिसेंबर 1927 ला त्यांना फैजाबाद जेलमध्ये फासावर लटकावण्यात आले. ग़दर पार्टीचे सैयद शाह रहमत यांनी फ्रांसमध्ये एक भूमिगत क्रांतिकारी म्हणून काम केलं आणि 1915 मध्ये त्यांच्या विद्रोही कार्यासाठी त्यांना फाशी दिली गेली. फैजाबाद (उत्तर प्रदेश) च्या अली अहमद सिद्दीकी यांनी जौनपुरच्या सैयद मुज़तबा हुसैन यांच्यासोबत मलाया आणि म्यानमारमध्ये भारतात विद्रोह करण्याची योजना बनविली आणि 1917 मध्ये त्यांनासुद्धा फाशी दिली गेली. ख़ान अब्दुल ग़फ़्फ़ार ख़ान यांनी ’लाल कुर्ती आंदोलन’ नावाचं ऐतिहासिक आंदोलन चालवलं. त्यांनी पठाणांना राष्ट्रीय आंदोलनात जोडून घेण्यासाठी ’ख़ुदाई ख़िदमतग़ार’ नामक संस्था स्थापना करून ब्रिटिशांविरोधात आंदोलन आणखी तीव्र केलं आणि अनेकदा कैद भोगली. इतकेच नाही तर बेगम हजरत महल, अस्घरी बेगम, अजीज़न बाई, बाई अम्मा या मुस्लिम महिलांनीसुद्धा ब्रिटिशांविरोधात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. बहादुर शाह ज़फ़र (1775-1862) हे भारतील शेवटचे मोघल शासक होते. त्यांनी 1857 च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भारतीय सैनिकांचं नेतृत्व केलं. यानंतर इंग्रजांनी त्यांना बर्माला (आताचे म्यानमार) पाठवलं तिथेच त्यांचा मृत्यू झाला. मुफ़्ती अती़कुर्रहमान उस्मानी, डॉ.सयेद महमूद, खान अब्दुस्समद खान अचकजाई, रफ़ी अहमद किदवई, युसूफ मेहर अली, बैरिस्टर आसिफ अली, हज़रत मौलाना अताउल्लाह शाह बुखारी, अब्दुल क़य्यूम अंसारी असे एक ना शेकडो मुस्लिमांची नावे सांगता येतील, ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात आपलं योगदान दिलं. जीव दिला पण एकानेही ब्रिटिशांना माफी मागितली नाही आणि पेन्शन घेतली नाही, त्याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. परंतु हे विकृत भिडे आरएसएसच्या अशा स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या एकातरी स्वयंसेवकांचे नाव सांगू शकतात काय? का सांगू शकत नाहीत?

वरील बाबींवरून आपल्या लक्षात येईल की, ज्या मुस्लिमांना हे कट्टरवादी, देशाचा शत्रू म्हणून आपल्या समोर उभे करतात त्या मुस्लिमांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य असे योगदान दिलेले आहे. याउलट, ज्या स्वयंघोषित कट्टर हिंदुत्ववाद्यांचे स्वातंत्र्यलढ्यात एक टक्कासुध्दा योगदान नाही तेच आज आपल्याला देशभक्ती शिकवत आहेत.

गांधी जर मुस्लिम असतील आणि त्यामुळे अत्यंत वाईट असतील तर आपले पंतप्रधान देश-विदेशात वारंवार त्यांचं नाव का घेतात? का त्यांच्या पुतळ्यांच्या पाया लागतात? का आरएसएस आपल्या प्रातःस्मरणात महात्मा गांधींचे नाव घेते? का देशाच्या पंतप्रधानांना आपल्या पदाची शपथ घेण्याअगोदर राजघाट वर जाऊन गांधींच्या समाधीचे दर्शन घ्यावे लागते? का? छातीठोकपणे करा न सगळं बंद? विदेशात जाऊन द्या गांधीला शिव्या? आहे हिम्मत? गांधींचे सोडून सगळीकडे नत्थूचे, गोळवलकर, सावरकरांचे नाव का घेत नाही? जे मनात ठासून भरलंय ते जाहीर बोलून छातीठोकपणे त्याची जबाबदारी घ्या की. भिडेंच्या सभा सुद्धा कडेकोट बंदोबस्तात होत आहेत, पासेस देऊन जवळच्या लोकांनाच प्रवेश दिला जातोय कारण गांधींसारखं संरक्षण न घेता निर्भयपणे जनतेत जाऊन बोलण्याची त्यांची धमक नाही. भित्रेपणा लपवता येत नसतो तो जागोजागी दिसणारच. 

ज्यांनी आयुष्यभर ब्रिटिशांची चाकरी केली, ब्रिटिशांकरिता आपल्याच क्रातिकारकांविरोधात कार्य केले. स्वातंत्र्यलढ्याला विरोध केला त्यांचेच वैचारिक वारस आज महात्मा ज्योतिबा फुलेंना ब्रिटिशांचा एजंट म्हणत आहेत. मग सुभाषचंद्र बोसांची ब्रिटिशांना घाबरून भेट नाकारणारे हेडगेवार, अनेक माफीनामे मागून सुटका करून घेऊन मरेपर्यंत ब्रिटिशांच्या पेन्शनवर जगणारे सावरकर, १९४२ चे चलेजाव आंदोलन चिरडून टाका व त्यासाठी आमची लागेल ती मदत घ्या असे ब्रिटिशांना पत्र लिहिणारे श्यामाप्रसाद मुखर्जी, भगतसिंगांची फाशी थांबविण्यासाठी अजिबात काहीही न करता या फाशीला मूकसंमती देणारे हेडगेवारांसह सर्व आरएसएस नेते, ज्यांच्या बयानामुळे बटेश्वर गावातील लीलाधर वाजपेयी सह ४ स्वातंत्र्यसैनिकांना शिक्षा झाली होती ते अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल भिडेंचे काय मत आहे हेसुद्धा त्यांनी मोकळेपणाने मांडले पाहिजे.

महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल भिडें इतके विकृत विचार आजपर्यंत कुणीच मांडले नाहीत. पण समाजातून त्यावर कोणतीही प्रतिक्रिया उमटत नाही. असे विकृत वक्तव्य केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात बिनदिक्कतपणे या भिडेंच्या सभा होतात ही त्या प्रत्येक जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. त्याला तगडी फडणविशी पोलीस सुरक्षा मिळते. या वक्त्यव्यावर स्वतः ला महात्मा फुलेंचा वैचारिक वारस म्हणविणारे समता परिषदेचे छगन भुजबळ व इतर ओबीसी नेते एका शब्दाने व्यक्त होत नाहीत हे धक्कादायक आहे. फडणवीस आणि काही बोन्डगुळं म्हणतात “भिडेंचा भाजपशी संबंध नाही, ते त्यांची स्वतंत्र्य संघटना चालवतात.” मग भुजबळांना व्यक्त होण्यात काय अडचण आहे? तुमची भाजपशी युती झाली ना? भिडेंच्या शिवप्रतिष्ठान सोबत नाही. मग मोकळेपणाने व्यक्त व्हा की. आणि फडणवीस फक्त तोंडाने बोलतात की “भिडेंचे वक्तव्य खपवून घेणार नाही” पण भिडेंवर कारवाई मात्र अजिबात करत नाहीत? उलट सुरक्षा देतात.  

माधवराव बर्वे यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर आपले मित्र रामशेठ उरवणे ह्यांना टिळकांची जमानत घ्यायला लावणारे ज्योतिबा. त्याकाळात विधवा विवाह बंदी, बालविवाह, शिक्षणबंदी, विधवा केशवपन, पादत्राणे बंदी अशा अनेक गुलामीच्या साखळ्यांमधून स्त्रियांना सोडवणारे फुले. ब्राम्हण जातीत पुनर्विवाह बंदी म्हणून विधवा झालेल्या स्त्री ने केशवपन करावे अशी प्रथा होती ती प्रथा मोडण्यासाठी न्हाव्यांचा संप घडवून आणणारे ज्योतिबा. ब्राम्हण जातीतील बाल-तरुणवयात विधवा झालेल्या स्त्रियांकडून तारुण्यसुलभ चुका घडत असल्यामुळे गर्भपात, बालहत्या, आत्महत्या होत होत्या. अशा महिलांसाठी 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करणारे ज्योतिबा. आई शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते हे जाणून सर्वच जातीधर्मातील स्त्रियांसाठी शाळा काढणारे, त्यात ब्राम्हण स्त्रियांनाही शिक्षण देणारे, सर्वच जाती धर्मातील स्त्रियांच्या सक्तीच्या प्राथमिक शिक्षणावर भर देणाऱ्या ज्योतीबांना ब्रिटिशांचे एजंट म्हणावे? ब्राम्हण विधवा असलेल्या काशीबाई यांच्या मुलाला दत्तक घेणारे,  (त्यावेळी इतरही अनेक जातीचे मुलं भेटले असते) त्याच्या नावे आपली सगळी चल-अचल संपत्ती करून त्याला चांगले शिक्षण देऊन डॉक्टर बनवणारे ज्योतिबा खऱ्या अर्थाने महात्मा होते. पण ते मोठेपण समजण्यासाठी अंगी संस्कार आणि संवेदनशीलता असावी लागते. जी भिडेंमध्ये नाही.

याशिवाय भिडे जाहीर बोलतोय की, तिरंगा झेंडा आपला ध्वज नाही. आपला ध्वज भगवा आहे. त्यामुळे आता गावागावात हिंदू स्वराज्य ध्वज स्तंभ उभारा. १५ ऑगस्ट ला सकाळी सर्व कुटुंब, मुलाबाळांसह रॅली काढा आणि भगवा ध्वज फडकवा. इतका जाहीर देशाच्या राष्ट्रध्वजाचा अपमान होत असताना सरकार मात्र मूग गिळून गप्प बसलंय. हे सर्व बोलत असताना हिंदूंच्या मुलींना निर्वस्त्र करून भर रस्त्यावरून फिरवलं जातं, त्यांचा बलात्कार होतो, हिंदूंची देशात दैना सुरू आहे, जे मुघलांच्याही कळत होत नव्हतं ते सगळं होतय यावर हे भिडे शब्दाने बोलत नाहीत. 

हा भिडेंचा दौरा म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर या महाराष्ट्रात पुन्हा भीमा-कोरेगाव सारखी दंगल घडविण्याची तयारी आहे. सोबतच देशात प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरलेलं सरकार आणि मणिपूरचे वास्तव हे सगळे मुद्दे झाकण्यासाठीची ही रणनीती आहे. पण या रणनीती मुळे अनेकांची राजनीती उघडी पडली आहे. आपण हा पुरोगामी महाराष्ट्राची आखडता कायम ठेवण्यासाठी यांच्या द्वेषाला प्रेमाने उत्तर दिले पाहिजे. सर्व सामाजिक चळवळींनी ह्यांच्या खोट्या विचारांचे पीक मारण्यासाठी खऱ्या विचारांची समाजात फवारणी केली पाहिजे. 

आपला देश खरंच खूप बदलतोय. २०१४ नंतर आपला देश असा अजब बनलेला आहे की देशात एका पारशी व्यक्तीशी लग्न केलं म्हणून इंदिरा गांधी मुस्लिम होते, तेच एका पारशी व्यक्तीशी लग्न करून स्मृती इराणी कट्टर हिंदू होते. भिडेंच्या वक्तव्याने दोन्ही महात्मांच्या महानतेत कवडीभर फरक पडत नाही पण आपण समाज म्हणून सपशेल फेल झालो आहोत इतकं मात्र नक्की सिद्ध झालंय. हेच भिडे ३० जुलै २०२३ला अकोल्यात आले असता त्यांच्या सभास्थळी जाऊन मी एक ‘मजबुती का नाम गांधी’ पुस्तक व एक सत्यशोधक ज्योतिबा फुले अशी दोन पुस्तके वाचायला दिलीत. वाचून भिडेंच्या डोक्यात वळवळणारे किडे मरोत अशी आशा करूयात.

– चंद्रकांत झटाले, अकोला

    ७७६९८८६६६६

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय