पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी घेण्यात येणार्या राज्य पात्रता चाचणीत (SET) एसईबीसी (SEBC) आरक्षणाचा समावेश करा, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे राज्य पात्रता परीक्षा (SET) चे प्रबंधक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी राज्य पात्रता चाचणीचे (SET) आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) आरक्षण अधिनियम – 2024 लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 27 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयानुसार सदरील अधिनियम लागू झाल्यापासून राबविण्यात येणार्या शासकीय / निमशासकीय भरती प्रक्रियेत व प्रवेश प्रक्रियेत संबंधित आस्थापनांनी बिंदूनामावलीत आवश्यक ते बदल करून 10 टक्के पदे एसईबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याचे सुचविण्यात आले आहे.
वरील शासन निर्णयाच्या अनुषंगाने एसईबीसी प्रवर्गात मोडणार्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून आवश्यक ती कार्यवाही करावी. राज्य पात्रता चाचणीसाठी (SET) आवेदन केलेल्या विद्यार्थ्यांना आपला प्रवर्ग बदलण्याची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच निवेदनात पुढे म्हटले आहे की, एसईबीसी आरक्षण समावेशाची कार्यवाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणार्या PET परीक्षेत तसेच चालू असलेल्या 111 प्राध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेसाठी लागू केली आहे. तरी राज्य पात्रता चाचणीसाठी (SET) प्रवर्ग बदलण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी, राज्य पात्रता चाचणीत (SET) एसईबीसी आरक्षण लागू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया चे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, राज्य सचिव रोहिदास जाधव यांची नावे आहेत.


हे ही वाचा :
अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश
मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर
तुम्ही तर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊतांवर घणाघात
शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !
मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार