पुणे : ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 साली झाला होता. ते स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांचे नातू होते.
राहुल बजाज यांनी अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल, सेंट स्टीफस कॉलेज-दिल्ली, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, मुंबई आणि कैथड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये शिक्षण घेतले होते. विशेष म्हणजे त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चेही शिक्षण घेतले होते.
2006 ते 2010 या काळात ते राज्यसभेचे खासदार होते. 1979 – 80 आणि 1999 – 2000 या काळात राहुल बजाज उद्योगांची संघटना सीआयआयचे अध्यक्षही होते.
भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना 2017 साली सीआयआय जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. 2001 मध्ये बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1968 मध्ये त्यांनी बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. बजाज ऑटोला नावारुपाला आणण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.