सोलापूर (प्रतिनिधी) : जनता उपासमार आणि बेरोजगारीने त्रस्त असताना सोलापूरवासियांना न झेपणाऱ्या व परवडणाऱ्या लॉकडाऊनची पुन्हा एकदा घोषणा करण्यात आली आहे. या लॉकडाऊनमुळे गरिबांचा रोजगार हिरावणार असेल तर आपण गप्प बसणार नाही. प्रसंगी तीव्र आंदोलन उभारू असा इशारा देत हे लॉकडाऊन तातडीने मागे घेण्यात यावे. अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी महा विकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांकडे ईमेल द्वारे केली आहे.
नरसय्या आडम मास्तर म्हणाले की, शहर व जिल्ह्यात यापूर्वीच्या ७२ दिवसाच्या लॉकडाऊननंतर आता पुन्हा एकदा १६ ते २६ जुलै दरम्यान लॉकडाऊन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही. लॉकडाऊन केल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग थांबणार साशंकता आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा संसर्ग ज्याठिकाणी होत आहे त्याठिकाणी नियोजनबद्ध काम, उपाययोजना आणि सक्षम यंत्रणेचा अभाव दिसून येत आहे.
७२ दिवसाच्या लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केली. तरीसुद्धा याचा प्रादुर्भाव आणि मृत्यूदर वाढतच राहिला. यावर सरकार आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा अभ्यास करून उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने मे अखेरपर्यंत बाधितांची संख्या घटेल आणि देश कोरोनामुक्तीकडे वाटचाल करेल, असे अंदाज वर्तविले होते. मात्र ते फोल ठरले.
वास्तविक पाहता कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरसकट सर्व नागरिकांची ड्रेसिंग आणि टेस्टिंग वाढविणे, आरोग्य तपासणी, दहा वर्षाखालील बालके व पन्नास वर्षापुढील वृद्धांची विशेष काळजी घेण्यासाठी यंत्रणा उभी करणे, औषधोपचार व बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय, ऑक्सिजन, जेवण, अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित यंत्रसामग्री उपलब्ध करणे, गर्दी रोखणे, बाधित रुग्ण व सामान्य रूग्ण यांच्यासाठी स्वतंत्र बाह्य रूग्ण विभागात उपचार करणे इत्यादी. उपाययोजना तातडीने करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय कोरोना आटोक्यात येणार नाही.
या सर्व बाबींचा विचार करून सोलापूरकरांना न झेपणारे व न परवडणारे लॉकडाऊन तातडीने मागे घ्यावे. जर उद्योगधंदे व श्रमिकांचा रोजगार हिरावणार असाल तर या लॉकडाऊनच्या विरोधात सिटू आंदोलनाच्या पवित्र्यात उतरेल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी स्पष्ट भूमिका आडम मास्तर यांनी निवेदनातून मांडली आहे.
प्रक्षोभ वाढल्यास सरकार जबाबदार
आता पुन्हा लॉकडाऊन करत असताना शहरातील विडी, यंत्रमाग, असंघटित, घरेलू कामगार, रिक्षाचालक, दुकानातील कामगार, कचरा वेचणाऱ्या महिला अशा जवळपास अडीच लाख लोकांचा रोजगार बुडणार आहे. याला जबाबदार कोण ?. श्रमिकांना कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावपेक्षा रोजगारविना जगतो की मरतो ही चिंता भेडसावत आहे. उपासमारीने भूकबळी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे कोरोनाच्या मृत्यूदरापेक्षा भूकंबळीचा मृत्युदर अधिक राहील. यामुळे जनतेचा प्रक्षोभ वाढेल. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास त्याला सरकार व प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिला आहे.