पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी उमेदवारांमध्ये तीव्र स्पर्धा होती. यात पुणे विद्यापीठातीलच सर्वाधिक 11 उमेदवारांचाही समावेश होता. आता तब्बल वर्षभरानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाला आहे.
डॉ. नितीन करमळकर यांचा मे 2022 मध्ये कुलगुुरूपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. अखेर मंगळवारी विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळाले.
कुलगुरूपदासाठी सप्टेंबरमध्ये कुलगुरू निवड शोध समिती स्थापन करण्यात आली होती. त्यावेळी एकूण 90 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यावेळी अर्जांची छाननी करुन 27 उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र करण्यात आले होते.
कोण आहेत डॉ. सुरेश गोसावी
डॉ. गोसावी हे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक, स्कूल ऑफ फिजिकल सायन्स विभागाचे संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी दि.26 ते 28 एप्रिल 2022 या काळात प्रभारी कुलगुरुपदाची धुराही सांभाळली आहे. संचालक, विभाग प्रमुख, वरिष्ठ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक या विविध पदावर कामांचा गोसावी यांना 31 वर्षांचा अनुभव आहे. विविध विषयांमध्ये संशोधन पेपर्सही सादर केले आहेत.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच डॉ. संजय घनश्याम भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी या नियुक्तीची घोषणा केली.
हे ही वाचा :
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना संधी