Mumbai : वांद्रे भागात शनिवारी पहाटे झालेल्या एका गंभीर अपघातामुळे पुन्हा पोर्शे कार प्रकरण चर्चेत आले आहे. मुंबईतील बड्या उद्योगपतीचा 19 वर्षीय मुलगा ध्रुव नलिन गुप्ता याने बेदरकारपणे कार चालवत पार्क केलेल्या दुचाकींना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात खळबळ उडाली आहे.
साधू वासवानी चौकाजवळ पदपथावर उभ्या असलेल्या अनेक दुचाकींना भरधाव पोर्श कारने जोरदार धडक दिली. ही घटना शनिवारी पहाटे 2:40 वाजता घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघाताचा थरार कैद झाला असून, कारच्या धडकेत दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की,अपघाताच्या वेळी कारमध्ये चार पुरुष आणि एका महिलेसह पाच जण होते. ध्रुव गुप्ता याच्यावर बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेऊन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. या तपासणीद्वारे तो दारूच्या नशेत गाडी चालवत होता का, याचा शोध घेतला जात आहे.
अपघातानंतर कारमधील तरुणीने एक बाटली बाहेर फेकल्याचे सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेमुळे तरुणांच्या बेजबाबदार वागणुकीवर जोरदार टीका होत आहे.
वांद्रे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तसेच वाहनाच्या वेगासंबंधी तपासणी केली जात आहे.
या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या अपघातांमुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि संभाव्य जीवितहानी रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी होत आहे.
Mumbai
हे ही वाचा :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय
95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत