मनपाने सर्व तलावांचे संचालन आणि व्यवस्थापन स्वतः करावे (Pimpri Chinchwad)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : वुई टुगेदर फाउंडेशनचे वतीने पिंपरी चिंचवड मनपाच्या जलतरण तलावाच्या खाजगी करणास विरोध करून सर्व तलावांचे संचालन आणि व्यवस्थापन मनपाने करावे, आदी मागण्या करणारे निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना दि. १८ रोजी दिले. निवेदनात शिष्टमंडळाने खालील आक्षेप घेतले आहेत. (Pimpri Chinchwad)
१) जलतरण तलावातील स्वच्छ्ता नियमित केली जात नाही. पाण्याची गुणवत्ता तपासली जात नाही.
२) अनेक तलाव बंद असतात. तरीसुद्धा विक्री सुरू असते.
३) जर हे जलतरण तलाव ठेकेदारांना चालवायला दिले तर ठेकेदार व्यावसायिक दृष्टी हाच उद्देश ठेऊन जलतरण तलाव चालवतील देखभाल, दुरुस्ती, नागरिकांची सुरक्षा याकडे ते दुर्लक्ष करतील.
४) खाजगी संस्था चारपट दरवाढ करत आहेत, 2023 मध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग, विद्यार्थी, खेळाडू यांना 500 रू वार्षिक शुल्क होते, ते 2024 मध्ये 2000 रू करण्यात आले. जवळपास वार्षिक पासमध्ये चार पट वाढ करण्यात आली.
तर इतरांना शुल्क 2023 पर्यंत 1000 रुपये होते, यावर्षी शुल्क 4800 रू आहे. ठेकेदार दरवाढ करतील त्यावर मनपाचे नियंत्रण राहणार नाही.
५) खाजगी ठेकेदार संस्थेकडे तलाव दिल्यानंतर विविध अपघात झालेले आहेत, 2023 मध्ये संभाजीनगर येथील जलतरण तलावात 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा जीवरक्षक नसल्याने बुडून मृत्यू झाला होता. तसेच ऑक्टोंबर 2023 मध्ये कासारवाडी येथील जलतरण तलावात क्लोरीन वायूची गळती होऊन 17 जण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आदी मुद्यावर आयुक्त शेखर सिंह यांचेशी वुई टुगेदर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करताना आक्षेप नोंदवले.
६) लोकाभिमुख दृष्टीने विचार करता सर्वच ठिकाणी फायदा तोट्याचा विचार मनपा प्रशासनाने करू नये. जलतरण तलाव व्यवस्थापन, संचालन ही मनपाची नागरी सेवा असून त्याचे खाजगीकरण करू नये, तेथे मनपाने स्वतःचे कर्मचारी जीवरक्षक, आणि इतर कर्मचारी, देखभाल दुरुस्ती मनपाने करावी. अशी मागणी करून खाजगीकरण करण्यास विरोध करण्यात आला. (Pimpri Chinchwad)
सवलतीचे आणि इतर शुल्क वाढणार नाही, खाजगी संस्थांना (PPP) धोरणानुसार जलतरण तलाव चालवण्यासाठी दिले आहेत – आयुक्त शेखर सिंह
आयुक्त खाजगीकरणाच्या भूमिकेवर ठाम
एकूण उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याचे सांगत शहरातील जलतरण तलाव तीन वर्षासाठी खाजगी संस्थाकडे चालवण्यासाठी दिले आहेत, यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना वार्षिक शुल्क मध्ये सवलती कायम ठेवण्यात आल्या आहेत, राज्यातील ठाणे, मुंबई मध्येही खाजगी संस्थांना जलतरण (PPP) धोरणानुसार चालवण्यासाठी दिले आहेत, आम्ही एकूण 10 तलाव खाजगी संस्थांना दिले आहेत, यामध्ये तिकीट विक्री, स्वच्छता, सुरक्षा, पाणी शुद्धीकरण याची जबाबदारी त्या त्या संस्थेकडे असणार आहे, आणि सुरक्षा देखभाल यावर मनपाचे लक्ष आहे, तसेच हा करार तीन वर्षासाठी आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे एकूण 14 जलतरण तलाव आहेत. पिंपळे गुरव, सांगवी, थेरगाव, पिंपरीगाव, यमुनानगर, भोसरी, चऱ्होली, नेहरूनगर, मोरवाडी, केशवनगर, चिंचवड, आकुर्डी रेल्वेस्टेशन, मोहननगर, कासारवाडी या ठिकाणी मनपाच्या क्रीडा विभागाच्या अखत्यारीत असलेले 10 जलतरण तलाव् तीन वर्षे ठेकेदार संस्थांना चालवण्यास मनपाने दिले आहेत.
आमच्या प्रतिनिधीने वुई टुगेदर फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष सलीम सय्यद यांचेशी संपर्क केला तेव्हा ते म्हणाले की, देशभरात सरकारचे सर्वत्र खाजगीकरण करण्याचे धोरण आहे, त्यामुळे सर्वत्र ठेके दिले जात आहेत, नागरी सेवांचे खाजगीकरण केल्यास सामान्य जनतेस खूप त्रास होतो.आणि नागरी सेवांची जबाबदारी आणि कर्तव्ये याकडे खाजगी संस्था दुर्लक्ष करतात.
आता हे खाजगीकरणाचे लोण जलतरण तलावा पर्यंत आले आहे आणि जलतरण तलावाचे शुल्क पाच पट वाढवले आहे, असे सलीम सय्यद यांनी सांगितले.
शिष्टमंडळात अध्यक्ष सलीम सय्यद सेक्रेटरी, श्री जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे, संस्थेचे सदस्य जाकीर हुसेन सय्यद, इक्बाल आत्तार, रवींद्र काळे उपस्थित होते.
या निवेदनावर वुई टुगेदर फाउंडेशनचे संस्थापक सदस्य क्रांतीकुमार कडुलकर, सल्लागार मधुकर बच्चे, उपाध्यक्ष दिलीप पेटकर, धनंजय मांडके, मोहम्मद शेख, निलेश आवारे, अर्जुन पाटोळे, राजीव सुभेदार, पांडुरंग खलाने, विलास रासकर, रवींद्र इंगळे, रणजित सोमवंशी, स्वाती पाठक,सोनाली मन्हास, वासंती काळे, मंगला डोळे – सपकाळे, अतुल शेठ, श्वेता जहागीरदार, प्रमोद आढाव, डॉ. पार्श्वनाथ वेलापुरे आदी सदस्यांच्या सह्या आहेत.
हे ही वाचा :
सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती
जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात
मोठी बातमी : प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन
मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी
धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप
परभणीतील हिंसाचारानंतर आंबेडकरवादी उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र खळबळ
ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी