Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : शहरातील हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘ग्रॅप’ प्रकल्पाची सुरुवात !

PCMC : शहरातील हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘ग्रॅप’ प्रकल्पाची सुरुवात !

प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवेच्या गुणवत्तेच्या अंदाजावर निरीक्षणाद्वारे होणार ठोस कृती (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ (GRAP) प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या प्रकल्पामध्ये शहराची हवेची गुणवत्ता पद्धतशीरपणे सुधारली आहे याची खात्री करण्यासाठी वास्तविक वेळेमध्ये निरिक्षण प्रणाली, अत्याधुनिक अंदाज आणि तात्काळ अंमलबजावणी यांचा समावेश आहे. (PCMC)

सदर प्रकल्पासाठी ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (C-DAC) द्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ग्रॅप (GRAP) उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून महानगरपालिकेने हवेच्या गुणवत्तेच्या आव्हानांचा अंदाज, निरीक्षण आणि सक्रियपणे कृती करण्यासाठी महत्वाचे धोरण तयार केले आहे.

यासोबतच, महानगरपालिकेने नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (NCAP) च्या अंतर्गत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महापालिका हद्दीमध्ये हवा शुद्धीकरण प्रणाली, धुके घालविणारी उपकरणे, रस्ता साफसफाई करणारी उपकरणे (रोड वॉशर) आणि पिचकारी आधारित पाण्याचे फवारे असणारी प्रणाली अशा विविध बाबींच्या माध्यमातून हवा प्रदुषित होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. (PCMC)

ग्रॅप प्रणाली द्वारे हवेच्या गुणवत्तेबाबत असे केले जाणार निरिक्षण

१. ग्रॅप प्रणालीच्या दोन, तीन व चार या टप्प्यांतर्गत सुधारित हवेच्या गुणवत्तेचा अंदाज हे सी-डॅक (C-DAC) च्या ‘निर्णय समर्थन प्रणाली’ नुसार हवेच्या गुणवत्तेच्या अंदाजांवर तीन दिवस अगोदर सुरू केले जातील. सुचविण्यात आलेले उपाय किमान १५ दिवसांसाठी किंवा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) मध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येईपर्यंत लागू करण्यात येतील. महानगरपालिका सी-डॅकच्या अंदाजानुसार, शहराच्या सर्व भागामधील पीएम २.५, पीएम १०, एनओ एक्स, एसओ एक्स सारख्या प्रदूषकांवर लक्ष केंद्रित करणार आहे.(PCMC)

२. वाहनांच्या प्रदूषणाची कठोर देखरेख ठेवण्यासाठी महत्वाची यंत्रणा निर्माण केली असून यामध्ये ANPR कॅमेरे आणि प्रत्यक्षरित्या कामावर असणारे कर्मचारी हे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि आणि वाहतूक पोलिस यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या आधारे एकात्मिक प्रणालीद्वारे उत्सर्जन नियंत्रण अनुपालन (ECC) ट्रॅक करतील.

३. औद्योगिक आणि बांधकाम प्रदूषणावर एक पाळत ठेवणारी एजन्सी नेमण्यात आली असून यामध्ये ३२ क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह ती आठ वॉर्डांमध्ये, उल्लंघनाच्या सदैव निरीक्षणासाठी तैनात करण्यात आली आहे.

हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या स्तरांवर चार टप्प्यांचा ग्रॅपचा कृती आराखडा…

शहरातील हवेच्या गुणवत्तेच्या पातळीनुसार त्यावर उपाय करण्यात येणार आहेत. यामध्ये उपाययोजनांसाठी हवा गुणवत्ता निर्देशांकाचा आधार घेऊन त्याआधारे चार टप्पे करण्यात आले आहेत.

टप्पा १ – (हवा गुणवत्ता निर्देशांक १०१ – ३००) : रस्त्यावरील धूळ नियंत्रित करणे, बेकायदेशीर कचऱ्याची विल्हेवाट लावणे, वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार.

टप्पा २ – (हवा गुणवत्ता निर्देशांक ३०१ – ४००) : डिझेल जनरेटरवरील निर्बंध, रस्त्यांची स्वच्छता आणि सार्वजनिक वाहतुकीचा प्रचार यांचा समावेश आहे.

टप्पा ३ – (हवा गुणवत्ता निर्देशांक ४०१- ५००) : अत्यंत प्रदूषण करणारे उद्योग बंद करण्यात येणार, वाहनांच्या प्रतिबंधात्मक क्षेत्र तयार करुन उल्लंघनावर कठोर दंड आकारण्यात येणार.

टप्पा ४ – (हवा गुणवत्ता निर्देशांक ५०० हून अधिक) : प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहन बंदी, संभाव्य शाळा बंद आणि कडक दंड लागू करण्यात येणार.

प्रदूषणाबाबत पाळत ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून रात्रं-दिवस गस्त

महानगरपालिकेने ग्रॅप प्रणालीचा एक भाग म्हणून पर्यावरणीय प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ठोस उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रदुषणाबाबत पाळत व दक्षता ठेवण्यासाठी, विविध प्रकारच्या कचरा – संबंधित व पर्यावरणीय उल्लंघनांवर नियंत्रण व गस्त घालण्यासाठी एक समर्पित एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये १ प्रोजेक्ट मॅनेजर, ४ पर्यवेक्षक, २ डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि ३२ जणांचा प्रत्यक्ष जागेवरील कर्मचाऱ्यांचा व ३९ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये नेमण्यात आलेल्या एजन्सीद्वारे स्वच्छ इंधन वाहनांचा वापर करून कर्मचाऱ्यांकडून शहरामध्ये रात्र-दिवस गस्त घालण्यात येईल.

म्हणून ग्रॅप प्रकल्प आहे महत्वाचा

१) सक्रियपणे हवेच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन: ग्रॅपच्या माध्यमातून हवा गुणवत्ता निर्देशांकांच्या अंदाजांवर आगाऊ उपायांवर शोधले जाऊन प्रदूषणाची जोखीम प्रभावीपणे कमी करण्यास मदत होते.

२) संरचित दृष्टीकोन: हे वायू प्रदूषणाच्या विविध स्तरांवर म्हणजेच मध्यम ते गंभीर अशा टप्प्याटप्प्याने प्रतिसाद योजना तयार करुन त्याची अंमलबजावणी करण्यात येते.

३) सार्वजनिक आरोग्याचे रक्षण: ग्रॅपनुसार थेट प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांवर उपयायोजना केल्याने खराब हवेच्या गुणवत्तेशी संबंधित आरोग्य धोके कमी करण्यात मदत होते.

४) शहरी राहणीमानामध्ये सुधारणा: नागरिकांचा सहभाग व हवेच्या गुणवत्तेसाठी विविध आधारावर विविध घटकांची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी केल्याने नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यास मदत होते.

‘ग्रॅप’ म्हणजे शहराला प्रदुषणमुक्त करण्याच्या प्रक्रियेतील एक मैलाचा दगड !


“पिंपरी चिंचवड शहराला प्रदुषणमुक्त करण्यासाठी ग्रॅप सारखा उपक्रम सुरु करणे म्हणजे शहराला प्रदुषणमुक्त करण्याच्या प्रक्रियेमधील एक मैलाचा दगड आहे. प्रगत तंत्रज्ञान, वास्तविक देखरेख आणि नागरिकांचा सहभागासह आम्ही शाश्वत विकासाला चालना देत आमच्या नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचे ध्येय ठेवले आहे. सदर उपक्रम पद्धतशीरपणे प्रदूषणाचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आला असून मी शहरातील सर्व घटकांना हे अभियान यशस्वी करण्यासाठी आपला सहभाग देण्याचे आवाहन करतो.”

शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

‘ग्रॅप’ उपक्रम म्हणजे शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठीचा प्रशासनाच्या वचनबद्धतेचा पुरावाच!

“ ग्रॅप उपक्रमामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून वास्तविक देखरेखची अंमलबजावणी करण्यात येते. यामुळे प्रदूषण होणाऱ्या घटकांवर प्रभावीपणे कारवाई करण्यास मदत होत असून हा प्रकल्प शहराच्या शाश्वत विकासासाठी महत्वाची भूमिका पार पाडतो. शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सदर उपक्रम म्हणजे प्रशासनाच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.”

संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

संबंधित लेख

लोकप्रिय