पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.९ – महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज जनसंवाद सभा पार पडली. आज झालेल्या जनसंवाद सभेत ६७ तक्रारी वजा सूचना प्राप्त झाल्या. (PCMC)
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांत करण्यात येते. सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या महापालिका क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना महापालिकेच्या अनुषंगाने असलेली कामे, अडचणी, तक्रारी, सूचना या सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभेत मुख्य समन्वय अधिकारी तसेच क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (PCMC)
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ६७ तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे १८, ६, ६, ३,२,८, ९ आणि १५ तक्रारी वजा सूचना मांडल्या. यामध्ये शहरातील रस्ते सुस्थितीत ठेवावेत, रस्ते व फुटपाथ वरील भाजी विक्रेत्यांवर यांच्यावर कारवाई करावी, रस्त्यांच्या कडेला कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, शहरामध्ये आवश्यक ठिकाणी स्थळदर्शक, दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलक लावावेत, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, शहरातील धोकादायक झाडे तोडणे तसेच रस्त्यांवर झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, उद्यानातील नादुरुस्त खेळणी, ओपन जिम साहित्य दुरुस्त करावे, शाळा महाविद्यालयांच्या परिसरात वेगाने दुचाकी चालवणाऱ्या लोकांवर कारवाई करावी तसेच गतिरोधक उभारण्यात यावेत आदी सूचनांचा समावेश होता.
नागरिकांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन संबंधित समस्यांचा निपटारा करण्यासाठी महापालिका यंत्रणा कार्यरत असून क्षेत्रीय कार्यालयनिहाय सबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.