आंबेगाव : चालू वर्षीच्या हंगामातील पूर्ण एफआरपी आणि अंतिम हप्ता तीनशे रुपये द्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भिमाशंकर सहकारी साखर कारखानेचे चेअरमन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सन २०२२-२३ या वर्षातील गाळप हंगामासाठी सरकारच्या नव्या धोरणानुसार १०.२५१४ या पायाभूत उताऱ्यानुसार पहिला हप्ता अदा करावयाचा आहे. या धोरणानुसार भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याने आपली एफ.आर.पी. प्रमाणित करुन तोडणी वाहतुक खर्च वजा करुन उर्वरीत एफ.आर.पी. ची रक्कम तातडीने उस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी व एफ. आर. पी. च्या कायद्याप्रमाणे पुर्ण एफ. आर. पी. ची रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच चालू वर्षीच्या हंगामासाठी कारखान्याला साखर, इथेनॉल, विज विक्री व अन्य मार्गाने चांगला नफा झाला आहे. सहकारी साखर कारखाना असल्याने मिळालेल्या नफ्यातून अंतिम हप्ता ३०० रुपये प्रती टन याप्रमाणे उस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात यावा या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना या विरोधात तिव्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रभाकर बांगर, पंढरीनाथ गावडे, पांडुरंग निकम, वनाजी बांगर, अनिल पोखरकर, नामदेव पोखरकर, कैलास पोखरकर, तुकाराम गावडे, संजय पालेकर, राजेंद्र गोडसे, अतुल गावडे, गोरक्ष गावडे, गोपाळ भोर, निलेश भोर, विशाल हांडे, गोरक्ष बोर, संतोष गोपाळे तुषार वाघ हे शेतकरी उपस्थित होते.