सोलापूर (प्रतिनिधी) : निसर्गावर भिस्त असणाऱ्या बळीराजाला सरकार सोबत निसर्गाने ही आता झोडपून काढीत आहे. जगाचा पोशिंदा अहोरात्र घाम गाळून पिकवलेल्या आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळावे म्हणून वर्षानुवर्षे टाहो फोडत आहे. त्याला न्याय मिळाला पाहिजे. भारतीय शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा यासोबत च शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात. याकरिता २३ जुलै रोजी कामगार शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घरातच राहून आंदोलन करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, लॉकडाऊन ने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी ज्या प्रकारे ठोस उपाययोजना ची तयारी प्रशासन मार्फत चालू त्याच धर्तीवर कामगार, कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या रोजीरोटी व पुनर्वसनाचा ही विचार करावा. संबंध देशात असंतोषाची भावना दुणावत असून याला वेळीच रोखणे सरकारने रोखले पाहिजे.
23 जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनात विद्यार्थी, युवा, महिला आणि ट्रेड युनियन्स मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचेही ते म्हणाले.