जुन्नर : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील गोद्रे गावातील दोन मजुरांना बळजबरीने आळेफाटा येथुन मजुरी देण्याच्या बहाण्याने पारनेर तालुक्यातील निघोज या ठिकाणी नेण्यात आले होते. तिथे नेल्यावर त्यांच्याकडून दिवस-रात्र काम करून घेतले व त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. एका खोलीमध्ये त्यांना डांबून ठेवण्यात आले.
याप्रकरणी नवनाथ शेटे व एका अज्ञात व्यक्तींविरोधात अनेक गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. नुकताच त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने देखील फेटाळला होता.
नवनाथ शेटे यांना अटक होत नसल्याने दोन्ही मजूरांनी उपोषणाचा इशारा दिला होता. गुन्हयाचे तपासामधील साक्षीदार नथु कोंडीबा काठे रा. गोद्रे व हरीभाऊ पुताजी मांडवे रा. गोद्रे हे आहेत.
जुन्नर पंचायत समितीचे सदस्य काळु चिंधा गागरे रा. खटकाळे व मधुकर भिमाजी रेंगडे रा. गोद्रे यांनी निघोज येथे घडलेला प्रकार कोणाला सांगितला, तर तुला मारुन टाकू, खल्लास करु अशी धमकी मजूर नंदू काटे यांना दिली होती. त्यामुळे काळू गागरे व मधुकर रेंगडे यांना सह आरोपी करण्यात आले असून कलम ५०६ वाढीव कलम लावण्यात आले आहे.