भोईर नगर कामगार कल्याण मैदानावर नाट्य संमेलनाच्या मंडपाचे पूजन
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.२३- शतकोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सहा आणि सात जानेवारी रोजी २०२४ ला पिंपरी चिंचवड शहरात होत आहे.राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही सर्वपक्षीय या नाट्यसंमेलनाचे नियोजन करीत आहोत.नाट्य संमेलन ही एक सांस्कृतिक चळवळ आहे;अशा भावनेतून आम्ही याकडे पाहतो.हे नाट्य संमेलन यशस्वी करण्यासाठी पिंपरी चिंचवडकरांनी सहकार्य करावे,असे आवाहन उद्योग मंत्री आणि मुख्य निमंत्रक उदय सामंत यांनी केले.
चिंचवड भोईर नगर येथील कामगार कल्याण मैदानावर नाट्य संमेलनाच्या मंडपाचे पूजन शनिवारी करण्यात आले.यावेळी सामंत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. तत्पूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी सामंत यांच्या उपस्थितीत नाट्य परिषदेचे पदाधिकारी व प्रतिनिधी यांची आढावा बैठक झाली.
यावेळी भाऊसाहेब भोईर,आमदार उमा खापरे,बांधकाम व्यावसायिक राजेश साकला, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, नियामक मंडळाचे सदस्य सतीश लोटके,तळेगाव नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे,शिरूर नाट्य परिषदेचे अध्यक्ष दिपाली शेळके,सचिन इटकर, माजी नगरसेवक राहुल कलाटे,अजित गव्हाणे, मयूर कलाटे,अनंत कोऱ्हाळे तसेच संतोष पाटील, राजेंद्र शिंदे,सुदाम परब,संतोष रासने,राजू बंग, आकाश थिटे,प्रणव जोशी आदी उपस्थित होते.
नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध चित्रपट निर्माते डॉ.जब्बार पटेल,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वागताध्यक्ष तर स्वागत समिती अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रमुख निमंत्रक म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत काम पाहणार आहेत.पिंपरी चिंचवड शहरातील महासाधू मोरया गोसावी क्रीडांगणावर मुख्य नाट्य संमेलन होईल. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, ग.दि.माडगूळकर सभागृह,आचार्य अत्रे रंगमंदिर,नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह तसेच भोईर नगर कामगार कल्याण मैदानावर बालनाट्य आयोजित केली जाणार आहेत.या नाट्य संमेलनात १६ व्यवसायिक पेक्षा अधिक नाटके,सुमारे एक हजार अधिक कलाकार सहभागी होतील आणि स्थानिक कलाकारांनाही संधी मिळेल,असे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.