Thursday, December 12, 2024
Homeकृषीबैठक निष्फळ : राज्यात दूध आंदोलन तीव्र होणार ! वाचा सविस्तर

बैठक निष्फळ : राज्यात दूध आंदोलन तीव्र होणार ! वाचा सविस्तर

(मुंबई) : दूध दराच्या प्रश्नाबाबत आज मंत्रालयात बोलवलेली बैठक निष्फळ ठरलेली आहे.  मंत्री सुनील केदार यांनी ठोस आश्वासन न दिल्याने, तसेच मागण्यांबाबत कोणताही निर्णय न झाल्याने राज्यात दूध आंदोलन तीव्र होणार असल्याचे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने म्हटले आहे.

    दूधाला किमान ३० रुपये प्रतिलिटर भाव मिळावा, या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेत आज दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी मंत्र्यांनी शेतकरी नेत्यांचे केवळ प्रश्न ऐकून घेतले. याबाबत मंत्रालयात चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

    परंतु, बोलावलेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. दुधाला ३० रुपये दर मिळावा, यासाठी सरकारने प्रति लिटर १० रुपये अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे, तसेच राज्यातील गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दूध पावडरला ५० रुपये निर्यात अनुदान मिळावे, या बैठकीतील मागण्या होत्या.


आजच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच! – डॉ. अजित नवले

    “महाराष्ट्र जनभूमी“शी बोलताना डॉ. अजित नवले म्हणाले, की आजच्या बैठकीत मुळ मुद्द्यावर चर्चा झालेली नाही. सरकारच्या वतीने कोणताही प्रस्ताव मांडला न गेल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. सरकार लवकरच या प्रश्नी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना आणेल असे बैठकीत सांगण्यात आले असले तरी अशी योजना नक्की कधी येणार याबाबत कोणतीही कालबद्ध सीमा सांगण्यात आलेली नाही. अशा पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने आपले आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा केली आहे.

    दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष न्याय मिळे पर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. किसान सभेचे नेते, राज्य कौन्सिलचे सदस्य व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेत्यांबरोबर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा तातडीने ठरविण्यात येणार असल्याचे डॉ. नवले म्हणाले.

संबंधित लेख

लोकप्रिय