Monday, September 16, 2024
Homeविशेष लेखMatki recipe : मटकी खाण्याचे फायदे आणि रेसिपी

Matki recipe : मटकी खाण्याचे फायदे आणि रेसिपी

आपल्या जेवणामध्ये नाश्त्यामध्ये आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळेस चांगली मोड आलेली मटकी खाल्ली तर त्याचे शरीराला फार चांगले फायदे होतात. हाडाच्या सर्व आजारांमध्ये मटकी लाभदायक आहे,कारण मटकी मध्ये व्हिटॅमिन सी आणि के, पोटॅशियम, मॅग्नेशियम,आणि लोह भरपूर प्रमाणात असतात. पचनसंस्था व्यवस्थित चालण्यासाठी यांनी मदत होते, तसेच आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते, वजन कमी होण्यासाठी नक्कीच फायदा होतो. (Matki recipe)

यामध्ये असणाऱ्या कॉपर मुळे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते त्यामुळे ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या पेशंटला मटकीचे सेवन करणे चांगले आहे

ज्या लोकांना हृदयाचे आजार आहेत, त्या लोकांना देखील मटकीचा फायदा होतो. मटकी मध्ये असणाऱ्या भरपूर अँटिऑक्सिडंट्स मुळे देखील आजारी असणाऱ्या लोकांना किंवा ज्यांचे वजन वाढत नाही अशा लोकांना खाण्याचा सल्ला देतो .

लहान मुलांना मेंदू किंवा मज्जासंस्थेशी निगडित काही आजार आहेत अशा मुलांनी नेहमी खाल्ल्यास त्यांची मेंदूची वाढ चांगल्या प्रमाणात होते.

आणि सर्वात महत्वाचं ज्यांना धुळीची ऍलर्जी आहे अस्थमा आहे अशा लोकांना नक्कीच फायदा होतो.

मटकी स्वस्त आहे, घरी मोड आणून मटकीची उसळ, रस्सा खूप छान आणि चविष्ट होतो. मिसळ मध्ये मटकी नसेल तर मिसळ खाऊशी वाटत नाही, कोकणात मटकी मध्ये सुके बोंबील, जवळा टाकून भारी टेस्ट देणारी रेसिपी प्रसिद्ध आहे.

मटकी रेसीपीचे साहित्य

2 वाटी मोड आलेली मटकी
1 कांदा
1 टोमॅटो
2 हिरव्या मिरच्या
7-8 कडिपत्याची पाने
2 टीस्पून आले लसुण पेस्ट
1 टीस्पून हळद
3 टीस्पून तिखट आपल्या आवडीप्रमाणे
1 टीस्पून मोहरी
1 टीस्पून जीरे
1/2 टीस्पून जीरे पावडर
1 टीस्पून धणे पावडर
1/2 टीस्पून हिंग
1-1/2 टीस्पून गोडा मसाला
1-1/2 टीस्पून मीठ चवीप्रमाणे
5-6 टेबलस्पून तेल
4 वाटी पाणी
1 टेबलस्पून गुळ
2 टेबलस्पून ओले खोबरे. आपल्या आवडीनुसार
कोथिंबीर

कृती

सर्वप्रथ मटकी एक रात्र भिजवून एका स्वच्छ कापडात ठेवावी, तिला दुसऱ्या दिवशी मोड येतात. कांदा, टोमॅटो बारीक करून घ्यावा. एका कढई मध्ये तेल गरम करून घ्यावे आणि मोहरी जीरे यांची फोडणी द्यावी. त्यानंतर मिरचीचे बारीक तुकडे घालावे. आता कांदा घालावा आणि थोडा 1/2 मिनिटे परतून घ्यावा. त्यानंतर कडीपत्ता, टोमॅटो घाला आणि थोडा परतावा. आता हिंग, हळद आणि आले-लसूण पेस्ट घालावी आणि चांगले 1 मिनिटं परतून घ्यावे. (Matki recipe)

त्यात अंदाजे लाल तिखट पावडर, जीरे – धणे पावडर घालावी आणि थोडे परतून घ्यावे. कोथिंबीर घालावी. त्यानंतर मटकी घालावी आणि चांगले हलवून घ्यावे. एकीकडे पाणी गरम करायला ठेवावे. पाणी थोडे गरम झाल्यावर या मटकी मध्ये घालावे आणि झाकण ठेवून 5 मिनिटे शिजू द्यावे. आता गोडा मसाला घालावा इथे तुम्ही तुमच्या घरात वापरणारा मसाला घालू शकता. आणि मीठ, ओले खोबरे आणि गुळ घालावा. त्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवर मटकी शिजू द्यावी साधारण 10-12 मिनिटे. आपली मटकी शिजली आहे का चव ई सर्व बघा.

आता मटकी शिजली की गॅस बंद करावा. आपली मटकीची भाजी तयार झाली आहे.
आणि तुम्ही ती पुरी, चपाती, भाकरी बरोबर किंवा पाव घेऊन खाऊ शकाल, किंवा नुसता भात आणि मटकीची भाजी खाल्ली तरी जेवण आनंदाने होते.
तर बनवा.
संकलन – क्रांतीकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय