Monday, December 23, 2024
Homeजिल्हासुदृढ राजकारण व समाजकारणाच्या केंद्रस्थानी माणूस हवा - प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन...

सुदृढ राजकारण व समाजकारणाच्या केंद्रस्थानी माणूस हवा – प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन !

कोल्हापूर : सर्वांगीण विकासासाठी राजकारण व समाजकारण सुदृढ असणे  गरजेचे असते. त्यासाठी राजकारण व समाजकारणाच्या केंद्रस्थानी माणूस असला पाहिजे. शेवटच्या माणसाचा विकास हे राजकीय व सामाजिक उद्दिष्ट बाजूला पडून, त्यातून माणसाला वजा करून जात – धर्म – पंथाच्या भिंती उभ्या करून माणसांची विभागणी करणे योग्य नाही. कृतिशील वैचारिकते ऐवजी विकृत भावनिकतेकडे राजकारण व समाजकारण नेण्याचा होत असलेला प्रयत्न अतिशय चिंताजनक आहे. असा बदल होणे हा स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा, त्यागाचा अपमान आहे . तसेच संवैधानिक मूल्यांनाही तडा देण्याचा पद्धतशीर प्रयत्न आहे. हा विशाल देश संकुचितते पासून वाचवणे हेच आजचे खरे आव्हान आहे.त्याचा संघटितपणे मुकाबला करणे गरजेचे आहे. त्यासाठीचा विचार वारसा भाई दाजीबा देसाई यांनी आपल्याला दिला आहे.त्याआधारे वाटचाल करणे हीच त्यांना आदरांजली ठरणार आहे. असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

ते भाई दाजीबा देसाई प्रतिष्ठान (बेळगाव) आणि भारतीय शेतकरी कामगार पक्ष (कोल्हापूर ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘कोल्हापूरचे माजी खासदार भाई दाजिबा देसाई स्मृती व्याख्यानमालेत’ पहिले पुष्प गुंफतांना बोलत होते. “बदलते राजकारण व समाजकारण ‘या विषयावर बोलत होते. 

महाराष्ट्रात उष्णतेची लाट : विदर्भात पारा 42 च्या पुढे, रत्नागिरी प्रथमच 40 अंश

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील होते. माजी आमदार संपतबापू पवार -पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बाबुराव कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.दिलीपकुमार जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रारंभी भाई दाजीबा देसाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, स्थितीवादी असण्यापेक्षा गतीवादी असणं हे चांगलंच. बदल हा सृष्टीचा नियम आहे हे ही खरे. पण तो बदल सर्वांगीण प्रगती करणारा हवा. राजकारण, समाजकारण व अर्थकारण यातून ‘एक मत’ म्हणून नव्हे तर ‘एक पत’ निर्माण करण्याचे प्रयत्न होण्याची अपेक्षा असते. राजकारण निवडणूक केंद्रित, निवडणूक उमेदवार केंद्रित, त्यासाठी समग्रतेऐवजी जात – धर्म यात विभागले जाणारे समाजकारण आणि भांडवलशाहीला शरण जाणारे अर्थकारण यामुळे होत असलेले बदल देश म्हणून आपण प्रगतीकडे की अधोगतिकडे चाललोय हे समजून घेण्याची गरज आहे. संवैधानिक मूल्यव्यवस्था मोडीत काढून, सर्व प्रकारची नैतिकता गुंडाळून ठेवून होत असलेली वाटचाल चिंताजनक आहे. राजकारण व समाजकारणाच्या घसरत्या पातळीचा संघटितपणे मुकाबला करणे ही आजच्या काळाची गरज आहे. 

१८ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षली जोडप्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण ; पुनर्वसनासाठी मिळणार १० लाख रुपये

प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, राजकारणाचे अराजकीयीकरण, संस्कृतीचे बाजारीकरण, शिक्षणाचे व्यापारीकरण, माणसाचे वस्तूकरण, सामाजिकतेचे असामाजीकरण, कुटुंबव्यवस्थेचे दुभंगीकरण, व्यवस्थेचे कंगालीकरण आणि सुदृढतेचे विकलांगी करण पद्धतशीरपणे केले जात आहे. हा बदल  राजकारण, समाजकारण, अर्थकारणाला संकुचित करतो आहे. राजकीय-सामाजिक जीवन हे समग्र जीवनाचाच एक भाग असते. आजचे मध्यवर्ती राजकारण, समाजकारण व्यवस्था परिवर्तनाच्या ध्येयाऐवजी सत्ताकारणासाठी केले जात आहे. अशावेळी वर्ण व वर्ग व्यवस्थेच्या नवभांडवली व्यवस्थेचे धोके समजून घेतले पाहिजेत. त्यातून सर्वसामान्य जनतेला बाजूला काढणे गरजेचे आहे. सर्वसामान्य माणसाचे प्रबोधनच राजकारण व समाजकारणाला समतावादी दिशेने नेऊ शकते. त्यासाठी आपण सातत्याने कृतिशील राहणे हीच राजकारण व समाजकारणाच्या सुदृढतेची हमी आहे. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या सव्वा तासाच्या ओघवत्या शैलीतील भाषणात या विषयाची तपशीलवार मांडणी केली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील म्हणाले, धर्मवादी राजकारणाचा प्रादुर्भाव वाढत जाणे हे देशहिताचे नाही. सर्वांगीण समता प्रस्थापनेच्या मार्ग राज्यघटनेच्या तत्वज्ञानातून जातो. त्याचा अंगीकार करणे व आग्रह धरणे अत्यंत गरजेचे आहे. या व्याख्यानास विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. शाहीर रंगराव पाटील यांनी आभार मानले.

प्रा.एन.डी.पाटील : सात दशके शेतकरी कष्टकरी जनतेच्या न्याय हक्कांसाठी लढणारा नेता – प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील


संबंधित लेख

लोकप्रिय