प्रयागराज : महाकुंभसाठी हजारो भक्त प्रयागराज कडे जाणाऱ्या महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे शेकडो प्रवासी वाहनात अडकले आहेत. हायवेवर वाहनांची लांबच लांब रांग उभी असून, या वाहतूक कोंडीची लांबी ३०० किलोमीटरपर्यंत पसरली आहे, असे वृत्त प्रसारीत झाले आहे. (Kumbhmela)
प्रशासनास पंचमीच्या अमृत स्नानानंतर, गर्दी कमी होईल अशी आशा होती. परंतु, सध्यातरी परिस्थिती उलट दिसत आहे. हजारो लोक प्रयागराजकडे जात आहेत आणि पवित्र स्नानासाठी मार्गस्थ होण्याचा प्रयत्न करत आहेत.
वाहनांची कोंडी नियंत्रणात ठेवणे पोलिसांना कठीण होऊन बसले आहे. मध्यप्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये प्रयागराजकडे जाणार्या रस्त्यांवर वाहतूक थांबवण्यात आली आहे.
Kumbhmela
प्रयागराजकडे जाणे अशक्य आहे कारण २००-३०० किलोमीटरची वाहतूक कोंडी आहे,” असे पोलिसांनी सांगितले आहे. या कोंडीला (Traffic jam) शनिवार व रविवारच्या सुटीमुळे झालेली गर्दी कारणीभूत ठरली आहे, असे रेव्हा क्षेत्रातील पोलिस निरीक्षक साकेत प्रकाश पांडे यांनी सांगितले. “ही परिस्थिती दोन दिवसांत सुधारेल आणि वाहने प्रयागराज प्रशासनाच्या समन्वयानेच रवानगी होतील,” असेही ते म्हणाले.
एका व्यक्तीने सांगितले की, “वाहने ४८ तासांपासून अडकली आहेत. ५० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी १०-१२ तास लागत आहेत.”
प्रयागराज, वाराणसी, लखनऊ आणि कानपूर कडून प्रयागराजकडे जाणार्या मार्गांवर २५ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. महाकुंभ महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या शहराच्या आत ७ किलोमीटर पर्यंत कोंडी होण्याचे दृश्य दिसले.
प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद करण्यात आले आहे, जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना घडू नये. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, “प्रयागराज संगम स्टेशन बाहेर भक्तांची गर्दी वाढल्यामुळे, प्रवाशांना स्टेशन सोडण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे स्थानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.” प्रयागराज जंक्शन स्थानकावर सध्या एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
वाहतूक उप आयुक्त कुलदीप सिंग यांनी सांगितले की, “वाहनांची संख्या प्रचंड आहे. अनेक लोक महाकुंभ क्षेत्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे लांब कोंडी झाली आहे.”