Tuesday, January 28, 2025

विशेष लेख : जुन्नर विधानसभेचा रणसंग्राम

Junnar Vidhansabha : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात येऊन ठेपल्या आहेत. जुन्नर तालुक्यातही विधानसभेची तयारी सुरू झाली असून विविध इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोघांमध्ये मुख्य लढाई होणार असल्याने या दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडीचे व त्यातूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मनोबल उंचावले असून त्यांच्याकडे इच्छुकांची तीव्र स्पर्धा सुरू आहे. महायुतीतील उमेदवारी वाटपाच्या धोरणानुसार विद्यमान आमदारांना उमेदवारीसाठी निवडणार असल्यामुळे आमदार अतुल बेनके यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व काँग्रेस पक्ष हे त्यांच्या पक्षाला जागा सुटावी म्हणून आग्रही आहेत. लोकसभेला मिळालेल्या घवघवीत यशामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या आमदारकीच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. शरदचंद्र पवार पक्षाकडे शरद लेंडे, अंकुश आमले , मोहित ढमाले, अनंतराव चौगुले, तुषार थोरात हे पक्षातील कार्यकर्ते तर सत्यशील शेरकर, देवराम लांडे व इतरही काही नेते शरदचंद्र पवार पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून तालुकाप्रमुख माऊली खंडागळे इच्छुक आहेत. याशिवाय काही अपक्ष ही लढण्याच्या तयारीने मैदानात उतरलेले आहेत. अशा सर्व परिस्थितीमध्ये तालुक्यात पुढील राजकीय गणित कसे असेल व कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल याबाबत कोणालाही पुरेपूर अंदाज आलेला नाही. जनतेलाही महायुती व महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला दिली जाते व अपक्षांसह ही निवडणूक तिरंगी, चौरंगी की पंचरंगी होते हे पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

लोकसभेत 51,500 मतांची भरघोस आघाडी मिळाल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे पारडे या विधानसभा निवडणुकीत जड राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र असे असले तरी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची एकजूट व महाविकास आघाडीकडे इच्छुक उमेदवार उमेदवारी नाकारल्यानंतर काय भूमिका घेतात यावर बरीच गणिते अवलंबून असणार आहेत. महायुतीत विद्यमान आमदार अतुल बेनके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता लक्षात घेता भाजपाच्या नेत्या आशाताई बुचके व शिवसेना शिंदे गटाचे नेते शरद सोनवणे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये योग्य ताळमेळ नाही त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. तसेच यावेळेस आदिवासी भागातील उमेदवाराही निवडणुक लढवण्याच्या तयारीत असून हे उमेदवार नक्की कोणत्या उमेदवाराचे राजकीय गणित बिघडवतील येणारा काळच सांगू शकेल.(Junnar Vidhansabha)

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी बरीच रस्सीखेच असली तरी सध्या उमेदवारांची तालुक्यातील सक्रियता पाहता काँग्रेसचे सत्यशील शेरकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश देऊन उमेदवारी मिळू शकते किंवा निष्ठावानाला न्याय द्यायचा झाला ओतूरचे जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांचा विचार होऊ शकतो. त्यामुळे तो या दोघांपैकी एक उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता जास्त आहे. महायुतीकडून विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. माजी आमदार शरद सोनवणे, आशाताई बुचके अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

जुन्नर तालुक्यात एकूण 356 बुथ व 3.20 लाख मतदार आहेत. विधानसभेचा विचार करता साधारण 55 ते 65 टक्के मतदान होण्याची शक्यता असते. सरासरी 60 टक्के मतदान होईल असे गृहीत धरल्यास 1.90 हजाराच्या आसपास मतदान होईल. सन 2014 व 2019 मधील चौरंगी व तिरंगी लढती पाहता जो उमेदवार साधारणपणे 140 ते 150 बुथवर मताधिक्य घेईल व किमान 70 हजार पेक्षा जास्त मते घेईल तो विजयी होईल.

शरद सोनवणे व आशाताई बुचके या दोघांचेही तालुक्यात स्वतंत्रपणे ताकद आहे. मात्र ही ताकद तालुकाच्या विशिष्ट भागात केंद्रित झाल्याचे मागील दोन विधानसभेच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. आळे पिंपळवंडी गटात व बेल्हे राजुरी मधील काही गावात शरद सोनवणे यांचे वर्चस्व आहे. आशाताई बुचके नारायणगाव वारूळवाडी व सावरगाव धालेवाडी या दोन गटात आपली बुथ वरील ताकद टिकवून आहेत. इतर जिल्हा परिषद गटात मात्र या दोघांची ताकद तुलनेने कमी आहे. त्यामुळे या उर्वरित जिल्हा परिषद गटात शरद सोनवणे व आशाताई बुचके कशा प्रकारची बांधणी करतात व मताधिक्य मिळवतात त्यावर त्यांचे यश अपयश अवलंबून असणार आहे.(Junnar Vidhansabha)

विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी माजी खासदार शिवाजीदादा आढळराव यांना प्रामाणिकपणे साथ दिली होती. त्यामुळे शिवाजीदादा आढळराव या निवडणुकीत त्यांची ताकद अतुल बेनके यांच्या पाठीशी उभी करण्याची शक्यता आहे. तसेच मागील काही दिवसांपासून आमदार अतुल बेनके यांनी तालुक्यातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवला असून त्याचा त्यांना येत्या निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र मागील दोन निवडणुकात अतुल बेनके यांची मदार ही प्रामुख्याने आदिवासी गावे व ओतूर पिंपरी पेंढार व बेल्हे राजुरी या जिल्हा परिषद गटांमध्ये होती. यातील आदिवासी मतदार हे (तांबे पाडळी व पिंपळगावजोगा डिंगोरे जि. प. गट) मोठ्या प्रमाणात अतुल बेनके व त्यांच्या पक्षाने भाजपसोबत महायुती केल्याने त्यांच्यापासून दुरावला आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, मोहित ढमाले हे शरदचंद्र पवार पक्ष सोबत राहिल्याने अतुल बेनके यांची ताकद या भागात कमी झाली आहे. राजुरी बेल्हे गटातही त्यांना पक्षफुटीचा मोठा फटका बसला आहे व विधानसभेला तो भरून काढणे हे खडतर आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. आमदार अतुल बेनके यांच्या भोवती असणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमुळे अनेक कार्यकर्ते नाराज होऊन शरद पवार गटात सामील झाले आहेत. शिंदे गट व भाजपा मधील नेत्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली असल्याने महायुतीचा उमेदवार म्हणून अतुल बेनके यांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता न करता येत नाही. या सर्व आव्हानांमुळे आमदार अतुल बेनके येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारची रणनीती तयार करतात व झालेले नुकसान भरून काढतात यावर त्यांचे निवडणुकीतील यश अवलंबून आहे.

महाविकास आघाडी च्या उमेदवाराला मागील निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याचा व वातावरणाचा फायदा मिळणार असला तरी उमेदवारी कोणाला मिळते? यावर बरेच राजकीय गणिते अवलंबून आहेत. शिवाय विद्यमान खासदार जुन्नर तालुक्यातील असल्याने व त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचाही फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होणार आहे. सद्यस्थितीत महाविकास आघाडी ही दीडशेपेक्षा जास्त बुथवर भक्कम असून त्यांनी विधानसभेलाही तशाच प्रकारे मतदान झाल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्याचा फायदा होणार आहे. पक्ष संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्ष नेतृत्वाने उमेदवारीची संधी दिल्यास त्याचा फायदा होईल. जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ओतूर पट्ट्यात “जमिनीवर पाय असलेला सर्वसामान्य माणूस” अशी त्यांची ओळख निर्माण झाली असली तरी तालुक्यासाठी नवीन चेहरा असल्याने सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. पक्षाची उमेदवारी मिळवण्याचे खडतर आव्हान त्यांना पेलावे लागेल. विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकरांचे नाव तालुक्याला परिचित असल्याने त्याचा त्यांना फायदा होईल. कारखान्याची यंत्रणा व कार्यकर्त्यांची फळी त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्याचा त्यांना निवडणुक प्रचारासाठी फायदा होईल. परंतु सत्यशील शेरकर यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यास अत्यंत कमी दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्ष संघटनेसोबत त्यांना एकरूप करण्याचे आव्हान पेलावे लागेल. तसेच सत्यशील शेरकरांवर नाराज असलेला पक्षातील एक गट पुन्हा आमदार अतुल बेनके यांच्याशी हात मिळवनी करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शिवसेनेचे तालुका अध्यक्ष माऊली खंडागळे हेही इच्छुक असून जर शिवसेनेला ही जागा सुटली तर ते चांगली लढत देऊ शकतील. परंतु सद्यस्थितीत ही जागा शिवसेनेला सुटण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला सर्व गोष्टींचा विचार करून जुन्नर मतदार संघाची विधानसभेची उमेदवारी द्यावी लागेल.(Junnar Vidhansabha)

आदिवासी भागातही जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे व काही आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. प्रस्थापित पक्षांकडून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता धुसर आहे त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून किंवा इतर पक्षांकडून निवडणूक लढवल्यास ते किती मतदान घेतात व त्याचा कोणत्या पक्षाला फटका बसेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यापूर्वीच्या निवडणुकात आदिवासी मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे झुकलेला असल्यामुळे या पक्षाला आदिवासी उमेदवार निवडणुकीला उभा राहिल्यास सर्वाधिक फटका बसेल. त्या खालोखाल आमदार अतुल बेनके यांना मानणारा मोठा वर्ग आदिवासी भागात असल्याने त्यांनाही या उमेदवारीचा फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी तुतारीचा उमेदवार व घड्याळाचा उमेदवार यांना आदिवासी भागातून मताधिक्य मिळणार नाही व त्यामुळे शरद सोनवणे व आशाताई बुचके यांना आदिवासी समाजाच्या या मत विभागणीचा मोठा फायदा होऊ शकतो.

या सर्व गुंतागुंतीमुळे जुन्नर तालुक्यातील येणारी विधानसभेची निवडणूक अत्यंत रंजक होणारा असून त्यात कोणाची सरशी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

किरण लोहकरे
सदस्य, विभागीय वनहक्क समिती पुणे विभाग

Junnar Vidhansabha

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

महाराष्ट्रातील या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद, ही आहेत कारणे

धक्कादायक : झारखंडमध्ये बॉम्बस्फोटाने उडवला रेल्वे ट्रॅक

आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी

दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल

अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू

Related Articles

- Advertisement -

Latest Articles