नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव येथे एका विवाहितेने दीड वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
रंजना ठवरे आणि अविनाश तांबे यांचा १५ एप्रिल २००९ मध्ये विवाह झाला होता, त्यांना पहिली चार वर्षाची आणि दुसरी दीड वर्षाची अशा दोन मुली होत्या. वंशाला दिवा म्हणून मुलगा पाहिजे यासाठी अविनाश तांबे याने दुसरा विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. याला रंजना विरोध करत असल्याने आरोपी तिचा शारीरिक, मानसिक छळ करत होते. या सततच्या त्रासाला कंटाळून रंजना यांनी त्यांच्या दीड वर्षाच्या मुली सोबत ९ जून २०२१ रोजी विहिरीत उडून आत्महत्या केली.
याबाबत रंजना यांचे वडील बुधा ठवरे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती, या प्रकरणी पोलिसांनी विवाहीतेचा पती अविनाश बंडू तांबे, दीर संतोष बंडू तांबे, सासरा बंडू लक्ष्मण तांबे, सासू बायडाबाई बंडू तांबे अशा चार व्यक्तींना अटक केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव हिंगे पाटील यांनी दिली.