पुणे : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित “द काश्मिर फाईल्स” या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा असून यावरुन दोन गट पडल्याचे दिसत आहे. आता प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील काश्मिर फाईल्सवरुन आपलं मत व्यक्त केलं आहे.
एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या नाना पाटेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे जे गट पडलेले आहेत ते चुकीचे आहेत. हिंदू आणि मुस्लिम इथलेच आहेत. त्यांनी एकत्र राहण्याची गरज असून, ते याच देशातील आहेत, असे ते म्हणाले.
नाना पाटेकर म्हणाले की, एखाद्या चित्रपटाबद्दल वाद होणं बरं नाही. मी काही काश्मिर फाईल्स पाहिलेला नाही. मात्र त्याबाबत ऐकलं आहे. आपल्या भारतीय लोकांना आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही. हे भारतीय लोकांना पटत नाही तोपर्यंत हे असे चिथवणारे यावर आपली पोळी भाजून घेणारे खूप असतील. परदेशी लोकं निघून गेले की तुम्हाला आपण भारतीय आहोत याची आयडेंटीटी आठवते. मग इथे असल्यावर तुम्हाला जात धर्म कसे आठवतात असा प्रश्नही नानांनी यावेळी उपस्थित केला. आणि आपण भारतीय आहोत हे मानावं जात धर्म घरी ठेवावेत.
चित्रपट पाहा, त्यातील वस्तुस्थिती कोणाला पटेल, कोणाला पटणार नाही. त्यामुळे गट पडणे साहजिकच आहे. पण तेढ निर्माण करणे चुकीचे आहे, असे परखड मत नाना पाटेकर यांनी मांडले.