घोडेगाव : सेंट्रल किचन बंद करा, अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश द्या, या व अन्य मागण्यांसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने आज (दि.१२) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव येथे बेमुदत मुक्काम आंदोलन सुरू आहे. Indefinite stay protest at Project Officer office of SFI
घोडेगाव शहरातून मोर्चास सुरूवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मांडल्या. प्रकल्प अधिकारी उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी कार्यालयात या अशा घोषणाबाजी केल्या. त्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि सहा. पोलीस निरीक्षक यांच्या समवेत चर्चा झाली. परंतु चर्चा निष्फळ झाल्यानंतर रात्री ८ वाजता प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड हे प्रकल्प कार्यालयात आले. रात्री १० वाजेपर्यंत शिष्टमंडळासोबत चर्चा चालू होती. परंतु तरीही मागण्यांवर तोडगा न झाल्याने आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय एसएफआय च्या वतीने जाहीर करण्यात आला.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी वसतिगृहांतील प्रवेशाच्या मागणीवर ठाम राहिल्याने आंदोलन चालूच राहणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व एसएफआय चे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, राज्य सहसचिव विलास साबळे, संदिप मरभळ, जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, जिल्हा सचिव नवनाथ मोरे, जुन्नर तालुका सचिव अक्षय घोडे, आंबेगाव तालुका अध्यक्ष दिपक वाळकोळी, सचिव समीर गारे, पुणे शहर अध्यक्ष अक्षय निर्मळ, जिल्हा सहसचिव प्रविण गवारी, जिल्हा कमिटी सदस्य राजू शेळके, निशा साबळे, कांचन साबळे, योगेश हिले, रोशन पेकारी, रोहिदास फलके हे करत आहेत. यावेळी ३०० ते ४०० विद्यार्थी उपस्थित आहेत.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
१) वसतिगृह अहवालाच्या धर्तीवर आश्रमशाळा पातळीवरील सेन्ट्रल किचन तात्काळ बंद करण्यात यावे.
२) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव अंतर्गत वसतिगृह प्रवेश क्षमता वाढवून ती ७ हजार करण्यात यावी.
३) शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ मध्ये मागेल त्या विद्यार्थी-विद्यार्थिनीला वसतिगृहात प्रवेश देण्यात यावा.
४) सर्व आश्रमशाळांवर प्रकल्प अधिकारी व एसएफआय चे प्रतिनिधी यांची संयुक्त भेट दौऱ्याचे तात्काळ नियोजन करण्यात यावे.
५) दि.२२,२३ मार्च,२०२३ रोजी एस.एफ.आय.च्या उपोषण आंदोलनास दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात यावी.
६) आश्रमशाळा व वसतिगृह यांचे पायाभूत सुविधांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावेत.
७) नागापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र तात्काळ सुरु करण्यात यावे.
८) MS-CIT, Tally व Typing चे प्रशिक्षण सुरु करण्यात यावे.
९) आश्रमशाळांच्या वेळेत केलेला बदल रद्द करून पूर्वीप्रमाणे सकाळी ११ वा. ते सायंकाळी ५ वा. अशी वेळ करण्यात यावी.
१०) इंग्रजी माध्यमाची शासकीस आश्रमशाळा घोडेगाव येथील प्रवेश क्षमता वाढविण्यात यावी व त्यासोबतच इ.११ वी. व इ.१२ वी.चे वर्ग सुरु करण्यात यावेत.
आश्रमशाळा विषयक मागण्या पुढीलप्रमाणे :
१) तालुक्यातील प्रत्येक आश्रमशाळेत व्यायामशाळा (जीम), ग्रंथालय, अद्ययावत् संगणक कक्ष, विद्यार्थी क्षमतेनुसार व मागणी नुसार खेळाचे साहित्य, अंघोळीसाठी गरम पाणी, पिण्यासाठी पिण्याचे स्वच्छ आणि पुरेसे पाणी पाणी (यासाठी आरो फिल्टर ) इ. सुविधा उपलब्ध करून द्यावे.
२) शासकीय आश्रमशाळा आहुपे येथे निवासी मुला-मुलींना झोपण्यासाठी बंग बेड तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावेत.
३) आश्रमशाळांनामधील कला,क्रीडा व शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक भरण्यात यावेत. यासोबतच संगणक शिक्षक देखील भरण्यात यावा.
४) गोहे आश्रमशाळा येथे मराठी विषय, आहुपे आश्रमशाळा गणित विषय शिक्षक भरण्यात यावा.
५) आहुपे आश्रमशाळा, असाणे आश्रमशाळा या सद्यस्थितीमध्ये पूर्णतः गळत आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यात यावी.
६) संघटनेच्या पाहणीमध्ये अनेक आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये मुलींसाठी असलेल्या सेनेटरी पॅड वेंडीग मशीन व डीस्पोझल मशीन बंद असलेली आढळून आली, त्या त्वरित दुरुस्त करण्यात याव्यात व जिथे नाहीत तिथे त्या बसविण्यात याव्यात.
७) खिरेश्र्वर आश्रम शाळेमध्ये गरम पाण्याच्या व्यवस्था नाही तसेच ती शाळा गळत आहे, याशाळेची इमारत दुरुस्त करण्यात यावी.
८) सोमतवाडी आश्रम शाळेमध्ये १ वॉर्डन आहे तेथे मुलींच्या संख्येप्रमाणे वॉर्डन भरण्यात यावेत. व मुलींची राहण्याची गैरसोय होत आहे, त्यामुळे आजुन एक वसतिगृह त्याठिकाणी बांधण्यात यावे.
९) सोनावळे आश्रमशाळा इमारतीस भेग गेलेली आहे, या इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी.
१०) प्रत्येक आश्रमशाळांवर सिक रूम बांधण्यात आलेल्या आहेत, मात्र अद्यापही त्या बंद आहेत, त्या सुरु करण्यात याव्यात व तेथे एक निवासी परिचारिका उपलब्ध करून देण्यात यावी.
वसतिगृह विषयक मागण्या पुढीलप्रमाणे :
१) मंचर वसतिगृह वर्षानुवर्षे प्रलंबित पाण्याची समस्या सोडविण्यात यावी. व मुलींच्या व मुलांच्या वसतिगृहांसाठी २४ तास पुरेल असे कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
२) घोडेगाव मुलींच्या वसतिगृहास शासकीय इमारत देण्यात यावी व यासोबतच ज्या वसतिगृहांना शासकीय इमारत नाही, अश्या सर्व वसतिगृहांसाठी शासकीय इमारत तात्काळ उपलब्ध करण्यात यावी.
३) जुन्नर मुलींचे वसतिगृहाकडे जाण्यासाठी रस्ता नाही, त्यांना रस्ताची सोय करण्यात यावी.
४) मुलींच्या वसतिगृहात सेनेटरी पॅड व डीस्पोझल मशीन बसविण्यात यावे, व ज्याठिकाणी बंद आहे ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत.
५) इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा येथे मुलींच्या व मुलांच्या वसतिगृहात पुरेसे जीम चे साहित्य पुरविण्यात यावे.