Pune : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डिपॉझिटच्या कारणावरून उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेच्या मृत्यूच्या प्रकरणावर आमदार शंकर जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, धर्मदाय रुग्णालयांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, याबाबत सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यातील धक्कादायक घटना | Pune
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका अत्यवस्थ गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डिपॉझिटची रक्कम भरली नसल्यामुळे तातडीने उपचार न मिळाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली असून, रुग्णालय प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आमदार जगताप यांची तीव्र संतप्त प्रतिक्रिया
या घटनेबाबत चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “घडलेली घटना जितकी दुर्दैवी आहे, तितकीच संतापजनक आहे. अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. (हेही वाचा – नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ८ महिला मजुरांचा मृत्यू)
आमदार जगताप यांनी पुढे बोलताना धर्मदाय रुग्णालयांच्या कारभारावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. “फक्त दीनानाथ मंगेशकर रुग्णालयच नव्हे, तर इतर धर्मदाय रुग्णालयांचीही निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच, या प्रकरणात दोषी आढळलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. (हेही वाचा – लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती)
मुख्यमंत्र्यांनी नेमली चौकशी समिती
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ चौकशी समिती नेमून आवश्यक पावले उचलली आहेत. “मला पूर्ण विश्वास आहे की, या प्रकरणात दोषींवर कोणतीही गय केली जाणार नाही,” असे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले. (हेही वाचा –धक्कादायक : नवरदेव पसंत नव्हता, नवरीनेच दिली हत्येची सुपारी)
डिपॉझिटच्या प्रथेबाबत नवा नियम आवश्यक
या घटनेच्या निमित्ताने रुग्णांना दाखल करताना मागवण्यात येणाऱ्या डिपॉझिटच्या अटीवरही गंभीर चर्चा सुरू झाली आहे. “अनेक रुग्ण आर्थिक कारणांमुळे वेळेत उपचार मिळवू शकत नाहीत, त्यामुळे सरकारने नवीन नियमावली तयार करून तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे,” असे मत आमदार जगताप यांनी व्यक्त केले. (हेही वाचा –माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची भर सभेत थोबाडीत, वाचा सभेत काय घडले)
शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्या धर्मदाय रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी करत आमदार जगताप यांनी ठाम भूमिका घेतली आहे. “जर रुग्णालये नियमांचे पालन करत नसतील, तर त्यांच्या जागा सरकारने पुन्हा ताब्यात घ्याव्यात, अशी जनभावना आहे, आणि मीही याच मताचा आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. (हेही वाचा – कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान)