नाशिक : महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे राज्यभरात नाराजी पसरली आहे. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असताना, एका शेतकऱ्याने कर्जमाफी आणि पीक विम्याबाबत प्रश्न विचारला असता कृषीमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांनाच सुनावत वादग्रस्त विधान केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी गावात शुक्रवारी (दि. ४ एप्रिल) कोकाटे यांनी अवकाळी पावसाने बाधित द्राक्ष आणि इतर पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर कर्जमाफी आणि पीक विम्याच्या विलंबाबाबत तक्रारी मांडल्या. एका शेतकऱ्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या “कर्जमाफी होणार नाही” या वक्तव्याचा संदर्भ देत कोकाटे यांना प्रश्न विचारला. त्यावर कोकाटे यांनी संतापजनक उत्तर दिले.
काय म्हणाले माणिकराव कोकाटे ? Manikrao Kokate
मला एक सांगा, आता येथे मीडिया आहे. मीडियासमोर असं बोलत नाही. पण तुम्ही मला सांगा. तुमची (शेतकऱ्यांची) कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयांची तरी गुंतवणूक करता का? सरकार तुम्हाला आता शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणार आहे. सरकार तुम्हाला पाईपलाईनाला पैसे, सिंचनासाठी पैसे, शेततळ्यासाठी पैसे देणार आहे. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. मग शेतकरी भांडवली गुंतवणूक करतात का? शेतकरी म्हणतात, पीक विम्याचे पैसे पाहिजे, मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा”, असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं आहे. माणिकराव कोकाटे हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी ते नाशिकमध्ये गेले होते. (हेही वाचा – नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ८ महिला मजुरांचा मृत्यू)
शेतकऱ्यांमध्ये संताप
कोकाटे यांच्या या वक्तव्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या विधानावर विरोधी पक्षांनीही जोरदार टीका केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी कोकाटे यांच्यावर निशाणा साधत म्हटलं, “माणिकराव कोकाटे हे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा झाले आहेत. (हेही वाचा – लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती)
ही पहिलीच वेळ नाही की कोकाटे यांचं वक्तव्य वादात सापडलं आहे. यापूर्वी त्यांनी “भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो” असं विधान केलं होतं. त्या वक्तव्यावरही शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्या बोलण्याने नव्या वादाला तोंड फोडलं आहे. (हेही वाचा –धक्कादायक : नवरदेव पसंत नव्हता, नवरीनेच दिली हत्येची सुपारी)
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र, सरकार स्थापन होऊन चार महिने उलटले तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कर्जमाफीऐवजी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांचं वक्तव्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचं प्रतिबिंब असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. (हेही वाचा –माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची भर सभेत थोबाडीत, वाचा सभेत काय घडले)