Tuesday, December 24, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : राष्ट्रभाव जागृत करणारे शिक्षण अत्यावश्यक – पद्मश्री रमेश पतंगे 

PCMC : राष्ट्रभाव जागृत करणारे शिक्षण अत्यावश्यक – पद्मश्री रमेश पतंगे 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : “शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रभाव जागृत करणारे शिक्षण देणे अत्यावश्यक आहे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री रमेश पतंगे यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३ रोजी केले. जागतिक शिक्षकदिनाचे औचित्य साधून क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित शाळांमधील शिक्षकांचे ‘शिक्षण कशासाठी आणि शिकायचे काय?’ या विषयावर प्रबोधन करताना रमेश पतंगे बोलत होते. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, उपाध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर, समिती सदस्य शाहीर आसराम कसबे, नितीन बारणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. Education that awakens nationalism is essential – Padmashri Ramesh Patange

रमेश पतंगे पुढे म्हणाले की, “‘शिक्षण कशासाठी आणि शिकायचे का?’ या मूलभूत प्रश्नांची उत्तरे कालसापेक्ष आहेत. आहार, निद्रा, भय, मैथुन या प्रेरणा मनुष्यासह सर्व प्राण्यांमध्ये उपजत असतात; परंतु शिक्षणामुळे माणूस प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. वारसा अन् पूर्वपरंपरेने माणसाला अनेक गोष्टींचे संचित ज्ञान मिळते. जीवनसंघर्षामध्ये प्रत्येक माणसाला आपले स्वतःचे स्थान निर्माण करावे लागते अन् त्यासाठीच शिक्षण अनिवार्य असते. समाजरचना ही नित्य प्रवाही असते. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे या रचनेत बदल होतात. तंत्रज्ञानाचा वेग अतिप्रचंड असतो. या बदलांची चाहूल शिक्षकांना घेता आली पाहिजे. लिहितावाचता येणे ही पूर्वीची साक्षरतेची संकल्पना आता खूप बदललेली आहे. ज्ञान ही आजच्या काळातील सर्वात मोठी संपत्ती आहे. दुर्दैवाने भारतात मूलभूत संशोधन करणारे विद्यार्थी खूप विरळ आहेत. त्यामुळे ज्ञानजिज्ञासू विद्यार्थी तयार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे!”

दुसऱ्या सत्रात डॉ. अशोक नगरकर यांनी संशोधनवृत्ती निर्माण होण्यासाठी मार्गदर्शन करताना, “संशोधनात पहिल्याच प्रयत्नात भव्यदिव्य निर्माण होण्याची अपेक्षा करू नका; परंतु छोट्या गोष्टींतून अन् सातत्यपूर्ण प्रयोगातून नावीन्यपूर्ण संकल्पना मूर्त स्वरूपात साकार होतात. कोणत्याही विषयात संशोधन करताना जागतिक पातळीवर त्यासंबंधी काय कार्य झाले आहे याचा शोध घ्यावा लागतो. बदलत्या भारतात विद्यार्थ्यांचे योगदान आणि त्यामागे शिक्षकांचे प्रोत्साहन आवश्यक आहे. अर्थातच त्यासाठी शिक्षकांनी नेहमी अद्ययावत असले पाहिजे!” अशा अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी नटराज जगताप, अश्विनी बाविस्कर, वर्षा जाधव, स्वप्ना झिरंगे, वैशाली धोंडे, योगिनी शिंदे, योगिश्वरी महाजन, दीप्ती बंदपट्टे, अश्विनी जाधव आदी शिक्षकांनी आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पना मांडल्या. 

गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविकातून, “दैनंदिन कर्तव्य पार पाडत असताना समाज अन् देशाच्या उन्नतीसाठी वेगळे आणि कृतिशील असे काय करता येईल, याचा मनाशी शोध घ्या!” असे विचार मांडले.

अतुल आडे, सतीश अवचार, मारुती वाघमारे आणि गुरुकुलम् मधील शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात सहकार्य केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संबंधित लेख

लोकप्रिय