पुणे : आज दिनांक 14 मार्च रोजी घरेलू कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्याच्या कामगार आयुक्त कार्यालयावर सी.आय. टी. यू. संलग्न पुणे जिल्हा घरकामगार संघटनेच्या वतीने उग्र निदर्शने करण्यात आली. पुणे शहराच्या विविध भागांमधून घरेलू कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
एप्रिल 2021 मध्ये आघाडी सरकारने घरेलू कामगार मंडळाकडे नोंदीत घरेलू कामगारांना रुपये पंधराशे एक वेळचे कोव्हिड अर्थसहाय्य जाहीर केले. एक वर्षानंतर राज्याच्या विकास आयुक्त (असंघटित कामगार) यांच्या ढिसाळ कारभारामुळे पुण्यात जेमतेम ६५०० घरेलू कामगारांना हे अनुदान मिळाले आहे. अजून हजारो कामगार वंचित असताना आता ही योजना गुंडाळण्याचा आणि त्यासाठी पाठवलेली रक्कम परत घेण्याचा घाट विकास आयुक्तांनी घातला असल्याचा आरोप करत संघटनेने तीव्र विरोध केला आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन नागपुरात होणार !
गेल्यावर्षी अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री अजित पवार यांनी घरेलू कामगारांसाठी संत जनाबाई कामगार कल्याण आणि सुरक्षा योजना जाहीर करून त्यासाठी 250 कोटी रुपये जाहीर केले. परंतु प्रत्यक्षात त्यासाठी एकही पैशाची तरतूद केली गेली नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घरेलू कामगारांसाठी पोकळ घोषणा करणाऱ्या राजकीय पक्षांचा घरेलू कामगारांनी तीव्र निषेध केला.
तसेच लढ्यातून उभे राहिलेले घरेलू कामगार कल्याण मंडळ बळकट करावे, त्यावर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करावी आणि कल्याणकारी योजनांसाठी किमान रुपये ५०० कोटी आर्थिक तरतूद करावी, मंडळात नोंदणीची पद्धत सुलभ आणि विकेंद्रित करावी, ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या कामगारांना लाभ मिळावा आणि किमान वेतन आणि पेन्शन मिळावे इ. मागण्या शिष्टमंडळाने अपर कामगार आयुक्त गीते यांच्यासमोर मांडल्या. त्यावर सकारात्मक चर्चा करून प्रलंबित अर्ज त्वरित निकालात काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. हे प्रश्न लवकरात लवकर न सोडवल्यास महिला येत्या काळात बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतील असा इशारा संघटनेने दिला आहे.
मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावर एल्गार, केल्या ‘या’ महत्वपूर्ण मागण्या
आंदोलनाचे नेतृत्व सीटू चे जिल्हा सचिव कॉम्रेड वसंत पवार, संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे, सीटू राज्य सचिव शुभा शमीम, संघटनेच्या सचिव सरस्वती भांदिर्गे उपाध्यक्ष अपर्णा दराडे आणि कामगार नेते गणेश दराडे, मोहन पोटे यांनी केले.