मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. उद्योजक आणि अकुशल, अर्ध-कुशल, कुशल मनुष्यबळ यामधील दरी कमी करण्यासाठी हे ऑनलाईन पोर्टल असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे :
◾️महाराष्ट्र, महाजॉब्स, आपले सरकार सुद्धा महाविकास आघाडीचे आहे. त्यामुळे ‘महा’ फॅक्टर आहे, जे करू ते भव्यदिव्य करू, त्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. त्या पावलाबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि हे पाऊल यशस्वी होवो या शुभेच्छा देतो.
◾️विकास म्हणजे जिथल्या तिथे रोजगार मिळाला पाहिजे, रोजीरोटी मिळाली पाहिजे, घर मिळाले पाहिजे आणि साहजिकच आहे, समाधान मिळाले पाहिजे. हे जर आपण सर्व एकत्र करून पुढे जात असू तर आपण निश्चित विकासाच्या दिशेने चाललो आहोत.
◾️महाराष्ट्र हा प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये देशातील इतर राज्यांपेक्षा एक पाऊल पुढे असला पाहिजे आणि तसा तो आहे, सर्व बाबतीत पुढे आहे. त्यात आणखी एक मानाचा तुरा रोवलेला आहे. महाजॉब्स, महाराष्ट्र म्हटल्यानंतर आपलं काम मोठं असलं पाहिजे, जे करू ते भव्यदिव्य करू.
◾️आपण महाजॉब्स पोर्टल आजपासून सुरू करत आहोत, ही आजच्या काळाची गरज आहे. कारण नोकऱ्या शोधायची किती आणि कुठे? मग नोकन्या लागताना पुन्हा वशिला येतो. आजपासूनच आपली यंत्रणा पारदर्शक असली पाहिजे. अत्यंत प्रामाणिकपणे इथे रोजगार आणि नोकऱ्या मिळवून देण्याचं काम आपण केलं पाहिजे.
◾️बरेच उद्योग वेतनकपत किंबहुना कामगार कपात करत आहेत. ही परिस्थिती अयोग्य आहे. एका बाजूला आपण उद्योजकांना आमंत्रित करतो, गुंतवणुकीला आकर्षित करतो, महाजॉब्स पोर्टल निर्माण करतो, जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण होईल त्याचे प्रयत्न करतो, ते करत असताना कामगारांची कपात करणे बरोबर नाही.
◾️परराज्यातील मजूर आपापल्या घरी निघून गेले आहेत. काही यायला सुरुवात झाली आहे, काही येणे बाकी आहेत. म्हणजे आपल्याकडे आज नोकऱ्या उपलब्ध आहेत, कामे रिकामी पडलेत पण कामगार नाही आहेत.
◾️उद्योगधंदे सुरू करायला आपण परवानगी दिलेली आहे. काही भागांमध्ये जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, तिथे मात्र आपण अजूनही थोडासा ब्रेक लावलेला आहे. आपण उद्योगधंदे सुरू करायला परवानगी दिली, नवीन उद्योजकांना आपण बोलवत आहोत, नवीन गुंतवणूक आणत आहोत, नवीन सुरुवात आपण करत आहोत.
◾️माणूस वणवण फिरत असतो, अपार मेहनत करतो, कष्ट करत असतो ते घरासाठी. पण घरासाठी मेहनत करत असताना घराकडे बघायला वेळ नव्हता. कोरोनाने गेले काही दिवस आपल्याला घराकडे बघायला शिकवलं आहे, आरोग्याकडे पाहायला शिकवलं आहे.