सावित्रीबाई फुले जयंती साजरी करताना. |
पिंपरी चिंचवड : आकुर्डी प्राधिकरण येथील तक्षशिला बुद्धीविहार मध्ये प्रा.अनु सोनवणे यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
केमुताई रामटेके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. आशाताई बैसाणे यांनी “ती घडली म्हणून आम्ही घडलो” ही कविता सादर केली. पुष्पाताई सोनवणे यांनी सावित्रीच्या ओवि म्हटल्या. तसेच पुष्पाताई जगताप यांनी “स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला’ आणि इतर ओव्या सादर केल्या. आशाताई शिंदे यांनी ‘काळोखाच्या वाटा तू आमच्यासाठी चालत होती’ ही कविता सादर करून आपले मनोगत व्यक्त केले.
प्रा. अनु सोनवणे यांनी सावित्री बाई ज्ञानवंत यांच्या घरी जावी असे त्यांच्या वडिलांची इच्छा होती म्हणून त्यांचा विवाह ज्ञानवंत जोतिबाशी करून दिला. सावित्रीबाई समाजासाठी झिजत होत्या. मुलींना शिक्षणासाठी त्यांनी प्रवृत्त केले. पहिली शाळा त्यांनी घरात भिडे वाड्यात काढली. समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी देह सोडला. तुम्ही आम्ही जे आहेत ते त्यांच्या पुण्याईमुळे आहोत. त्यांनी अस्पृश्य मुस्लिम स्त्रियांना शिक्षण दिले. शिक्षण हाच त्यांचा धर्म होता. स्वातंत्र व शिक्षणाचा वसा त्यांनी महिलांसाठी घेतला होता. त्यांना कमी आयुष्य लाभले, तरी भरपूर काम करून गेल्यात. जीवनात तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला महत्त्व आहे . कोणत्याही कामाची सुरुवात स्वतःपासून करा. काही करायचेच असेल तर जिद्द पाहिजे. आपण कोणालाही केलेली मदत ही फिक्स डिपॉझिट असते. त्यामुळे आपण एकमेकांना सहाय्य करूया, असेही प्रा. सोनवणे म्हणाल्या. यानंतर अध्यक्षीय भाषण प्रताप सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील तायडे
तक्षशिला मित्र संघ, आकुर्डी प्राधिकरण, पुणे यांनी केले. सूत्रसंचालन निर्मलाताई वालकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार रंजनाताई निमगडे यांनी व्यक्त केले. धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. उपस्थितांना तक्षशिला मित्र संघाच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला.
– क्रांतिकुमार कडुलकर