ठाणे : समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली. त्यामुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे. चार ते पाच जण जखमी आहेत. तर मृत्यू चा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याआधी ही दुर्देवी घटना घडली आहे.
अंधार असल्याने गर्डर आणि मशिनच्या सांगाड्याखाली नेमके किती जण दबले आहेत किंवा मृतांचा निश्चित आकडा किती आहे, हे सांगता येऊ शकत नाही. रात्रीही समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, त्यावेळीच ही दुर्देवी घटना घडल्याचे समजतेय. शाहपूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे. सुरक्षेची कोणताही उपाय योजना नसल्यामुळे मजुरांचा दुर्देवी मृत्यू झालाय.
मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांवर कोसळली. आतापर्यंत 15 मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार घेण्यासाठी पुण्याला येणार आहेत. तसेच ते पुण्यात मेट्रोचेही उद्घाटन करणार आहेत. त्याआधीच काही तास असतानाच दुर्देवी घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुर्घटनास्थळी येणार का?
डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या 520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर गावापर्यंतचा एकूण 600 किमीचा रस्ता खुला झाला आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा आणि तिसरा टप्पा येत्या डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा शंभर किलोमीटरचा टप्पा आहे.
समृद्धी महामार्गावरील दुर्घटना आणि अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर प्रवासी बसला मोठा अपघात झाला होता. अपघातानंतर बसने पेट घेतला आणि त्यात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.