Home राज्य Asha Worker : आशा व गटप्रवर्तकांच्या मागणीचा प्रश्न विधानसभेत; काय चर्चा झाली...

Asha Worker : आशा व गटप्रवर्तकांच्या मागणीचा प्रश्न विधानसभेत; काय चर्चा झाली पहा ! 

संग्रहित छायाचित्र

मुंबई : महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने आशा व गटप्रवर्तकांच्या पगार वाढीचा अध्यादेश (जीआर) काढण्याच्या मागणीसाठी १८ दिवसांपासून आझाद मैदानावर आशा व गटप्रवर्तकांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे ‌‌‌‌. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो महिला या आंदोलनात मुलाबाळांसह सहभागी झाल्या आहेत. परंतु सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. आंदोलनाची साधी दखलही घेतली जात नसल्याने आंदोलक महिला संताप व्यक्त करत आहेत. Asha Worker : The question of the demand of Asha and group promoters in the Assembly

आशा व गटप्रवर्तकांनी तीन महिन्यांपूर्वी पगार वाढ, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व अन्य मागण्यांसाठी संप केला होता. त्यावेळी सरकारने पगार वाढीचे आश्वासन दिले होते. परंतु सरकारने अद्याप त्याची अंमलबजावणी केली नसल्याचे आशा व गटप्रवर्तकांना सातत्याने आंदोलन करावे लागत आहे. त्यांची एकच मागणी आहे की, “सरकारने तीन महिन्यांपूर्वी दिलेले आश्वासन पुर्ण करावे.”

आज विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्याच अनुषंगाने आज विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला. आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्या मागण्यांवरुन विरोधक सभागृहात आक्रमक झाल्याचं दिसून आलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आशा वर्करच्या आंदोलनावर विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. आया-बहिणी घरदार सोडून गेल्या कित्येक दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत, सरकार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार आहे का, त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, असे वडेट्टीवार यांनी म्हटले होते. 

विरोधी पक्षनेत्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी, आशा वर्कर यांच्या आंदोलनावर भाष्य केले. आशा वर्कर यांची मुख्यमंत्र्यानीही भेट घेतली, त्यांच्या मागणीनुसार आंदोलकांनी चर्चेला पुढे यायला हवं. चर्चेतून मार्ग निघत असतो, आंदोलकांनी थोडं पुढं-मागं व्हावं… शेवटी आपल्या इतरही आर्थिक बाजूंचा विचार करावा लागतो. आशा वर्कर्स ह्या आमच्या बहिणीच आहेत, जर सरकार दोन पाऊले मागे येत आहे, मग तुम्हीही दोन पाऊलं मागे यायला हवं, असे म्हणत आशा वर्कर आंदोलनावर अजित पवार यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.

मात्र, दुसरीकडे आशा व गटप्रवर्तक आपल्या मागण्यांवर ठाम असून १८ दिवसांपासून उपाशीतापाशी, थंडी-हवेत, मुलाबाळांसह हे आंदोलन सुरू आहे. सरकारच्या या भूमिकेनंतर आशा व गटप्रवर्तकांच्या आंदोलनावर तोडगा निघणार की नाही? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे ‌. 

आशा व गटप्रवर्तक आंदोलनावर ठाम !

हजारो आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी १२ जानेवारीपासून राज्यभरात संप पुकारला आहे. ९ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी ठाणे गाठलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी ठाण्यात आलेल्या आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही निर्णय घेऊ. मात्र, त्यानुसार कारवाई होत नसल्याने हजारोंच्या संख्येने ठाण्यात आलेल्या या आंदोलक महिलांनी मुंबईचं आझाद मैदान गाठलं आणि १० फेब्रुवारीपासून तिथेच धरणे आंदोलन सुरु केलं आहे.

“या” विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन 

MIB : माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती

Exit mobile version