आळंदी/अर्जुन मेदनकर : येथील ग्रामदैवत श्री हजेरी मारुती उत्सव समिती , समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांचे विशेष प्रयत्नातून तसेच देणगीदार, व्यक्ती, संस्था, भाविक यांचे सहकार्याने ग्रामदैवत श्री हजेरी मारुती मंदिराच्या सभामंडपाच्या दगडी कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे हस्ते रविवारी ( दि. १ ) सकाळी नऊ वाजता होणार असल्याचे माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक डी. डी. भोसले पाटील व माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांनी सांगितले.
सभामंडपाचे काम पूर्वी श्री हजेरी मारुती मुख्य मंदिर कळसासह श्रींचा गाभारा, सभामंडप काम करण्यात आले असून आता सभा मंडपाच्या दगडी बांधकामाचा प्रारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कृषिमंत्री शरद पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे उपस्थितीत होणार आहे. हजेरी मारुती मंदिराचे कळसाचे लक्षवेधी जिर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यात आल्याचे माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांनी सांगितले.
श्री हजेरी मारुती मंदिर नूतनीकरण, जीर्णोद्धाराचे कामाचे परिसरातील नागरिक, भाविक आणि वारकरी संप्रदायातून स्वागत करण्यात येत आहे. आळंदीचे वैभव श्री हजेरी मारुती मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम लक्षवेधी होत आहे. सुरु असलेल्या कामात नागरिकांनी समाधान व्यक्त केले. श्रींची पालखी पंढरपूर येथून परत आल्यावर येथे सर्व दिंडी प्रमुख, विणेकरी दिंडेकरींची हजेरी धार्मिक परंपरा जोपासत कार्यक्रम हरिनाम गजरात होत असतो.
ग्रामदैवत श्री हजेरी मारुती मंदिराच्या सभा मंडपाच्या दगडी कामाचे शुभारंभास ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या कामास नागरिक, दानशूर व्यक्ती, संस्था यांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन आळंदीकर ग्रामस्थ यांनी केले आहे.
आळंदी हजेरी मारुती मंदिर सभामंडप दगडी कामाचा प्रारंभ शरद पवार यांचे हस्ते होणार
संबंधित लेख