Thursday, December 12, 2024
HomeNewsजनभूमी साहित्य :कविता - सहजच नाही ...! - अपेक्षा बेलवलकर

जनभूमी साहित्य :कविता – सहजच नाही …! – अपेक्षा बेलवलकर

सहजच नाही…!

सहजच नाही लिहू शकत कोणी,

आधी प्रतिकूल परिस्थितीतून जावं लागतं.

मन लागतं तुटावं,

खूप सार्‍या वेदनांना लागतं जावं सामोरं.

करावं लागतं खूप काही सहन

त्या विशिष्ट मानसिक अवस्थेत

खचून न जाता

स्वतःला सावरून

पुन्हा नव्या जिद्दीने

उभं राहावं लागतं.

सहजच नाही लिहू शकत कोणी…

हे साहित्यिक जरा भासतात वेगळे

कारण

त्यांच्याकडे असते प्रत्येक घटनेकडे सूक्ष्मपणे पाहण्याची दृष्टी.

त्यांना होते दर्शन

व्यक्ती – व्यक्तींच्या अंतर्मनाचे

म्हणूनच ते असतात असामान्य

बहुधा लोक त्यांना समजतात विक्षिप्त.

सहजच नाही लिहू शकत कोणी…

समाजमनाच्या भावभावना व्यथा

टिपतात ते अचूक

या भावना शब्दात मांडताना

होते प्रतिभा जागृत.

घडते नवे साहित्य

जसे सुवर्णास अग्निज्वाला  दिल्यास

त्याची कांती होते तेजस्वी

तशी असते प्रतिभा साहित्यिकाची

परंतु ती प्रत्येकाला समजतेच असं नाही.

सहजच नाही लिहू शकत कोणी….

तेव्हा या प्रतिभासंपन्न साहित्यिकांना

माझे नम्र आवाहन

तुम्ही समजा स्वतःस भाग्यवान

कारण

ईश्वराच्या इच्छेनेच आहात तुम्ही

या अतुलनीय कलेस पात्र. 



अपेक्षा बेलवलकर, सांगली

abelvalkar56@gmail.com

संबंधित लेख

लोकप्रिय