प्रतिनिधी : सर्व राजकीय कैद्यांची मुक्तता करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोने केंंद्र सरकारकडे केली आहे.
माकपने म्हटले आहे की, सध्या कारावासात ठेवण्यात आलेल्या कित्येक राजकीय आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांची प्रकृती वरचेवर बिघडत असल्याविषयी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पॉलिट ब्यूरो गंभीर चिंता व्यक्त करत आहे. त्यापैकी काहीजणांना तुरूंगातच कोव्हिड-१९ ची लागण झाल्याचे समजते. कैद्यांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या आपल्या तुरूंगांची अवस्था अतिशय दयनीय असून त्यात अगदी प्राथमिकदेखील सुविधांचा अभाव असल्याने या राजकीय कैद्यांची प्रकृती जास्त जास्तच खालावत आहे. त्यांच्यातील अनेकांना इतर आजार असून त्यासाठी त्यांच्यावर दीर्घकाळ औषधोपचार चालू आहेत.
अखिल गोगोई यांना कोव्हिड-१९ ची लागण झाल्याचे वृत्त आहे. वरावरा राव यांची तब्येतदेखील चिंताजनक झाल्याचे समजते. तुरूंगांतील गर्दी, अपुरी जागा आणि बेसुमार अस्वच्छता यांच्या परिणामी खोट्या आरोपांखाली तुरूंगवासात ठेवलेल्या गौतम नवलाखा, आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज, शोमा सेन आदी नामवंत मानवी हक्क कार्यकर्त्यांना कोव्हिड-१९ ची लागण होण्याचा धोका संभवतो. सर्व राजकीय कैद्यांमध्ये ९० टक्के अपंगत्व आणि काही जीवघेण्या व्याधींसकट १९ प्रकारचे आजार असलेल्या प्रा. साईबाबांची प्रकृती तर फारच नाजूक आहे. युनोच्या विशेष मानवी हक्क दूतांनीदेखील साईबाबांची आरोग्याच्या कारणावरून मुक्तता करण्याची मागणी केली होती.
हे पाहता सर्व राजकीय कैद्यांना त्वरीत जामिनावर मुक्त करून त्यांच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार सुरू करावेत, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोने केली आहे.