सोलापूर : रेेल्वे खाजगीकरणाविरोधात सेंटर ऑफ ट्रेंड युनियने येेथील गांधी पुुुतळा परिसरात आंदोलन केले, यावेळी १३८ जणांना ताब्यात घेण्यात आले.
माकपचे माजी आमदार आडम मास्तर म्हणाले की, भारत सरकारने १०९ रेल्वेमार्गावर १५१ खाजगी रेल्वे गाड्या चालवण्यासाठी देशी-विदेशी खाजगी कंपन्यांना निमंत्रित केले आहे. यापूर्वीच सरकारने रेल्वे इंजिन व बोगीचे उत्पादन, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल चे काम व मालवाहतूक मार्ग यामध्ये १०० टक्के परकीय गुंतवणुकीला मुभा दिली आहे. व आता क व ड गटाच्या रिक्त असलेली ५० टक्के पदे रद्द करण्याचा व नवीन पदनिर्मिती वर प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार ४०० रेल्वे स्टेशनचे जमिनीसह खाजगीकरण करणार आहे.
रेल्वे डबे कारखाना व इंजिन कारखाना खाजगीकरण करून त्याला वेगळे करून शेअर्स मार्केटमध्ये त्याचे शेअर्स ठेवणार आणि त्याचे खाजगी कंपनीत रुपांतर करणार. खरे पाहता रेल्वे तिकीट दरामध्ये ४७ टक्के अनुदान आहे. या रेल्वेमधून दरवर्षी सरकारला २००० अब्ज महसूल मिळतो. अर्थातच भारतीय अर्थ व्यवस्थेची रक्तवाहिनी असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रामधील अत्यंत महत्वाचे व स्वतंत्र अर्थसंकल्प असलेले रेल्वे खाते सरकार या देशातील करबुडव्या, दिवाळखोर नफेखोर भांडवलदारांना रेल्वेचे खाजगीकरण करून आंदण म्हणून देण्याचा घाट घातलेला आहे. वास्तविक पाहता रेल्वे म्हणजे देशाच्या अर्थ व्यवस्थेला सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. सरकार अंडी विकण्याऐवजी कोंबडीच विकायला निघाले. म्हणजेच पुन्हा देश गुलामीकडे नेण्याचे द्योतक असल्याची टीका कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी केली.
खाजगीकरण रद्द करा, क व ड वर्गातील ५० टक्के पदे रिक्त करण्याचा निर्णय मागे घ्या, १ लाख २५ हजार रिक्त पदे तातडीने भरा, प्रतिगामी धोरणे घेणारे मोदी सरकार मुर्दाबाद, रेल्वे मजदूर एकता जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद अशा गगनभेदी आवाजात घोषणा देत सारा परिसर दुमदुमून सोडले व निषेधाचे फलक दाखवत तीव्र निदर्शने केली.
यावेळी आडम मास्तर म्हणाले कि, जगात सगळ्यात स्वस्त १०९ कि.मी. वेगाने चालणारे इंजन आणि रेल्वे डबे बनवणारे कारखाना भारतच आहे. परंतु सरकार हे इंजन व बडे खाजगी कंपनीकडून विकत घेते. सर्वसामान्य भारतीयांच्या प्रवासासाठीचा सर्वोत्तम पर्याय असणारी वाहतूक म्हणजे रेल्वे. भारतीय रेल्वे ही भारताची सरकार नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतातील रेल्वे मार्गाची एकूण लांबी ६७,४१५ कि.मी. इतकी आहे. भारतीय रेल्वे दररोज २ कोटी ३१ लाख प्रवासी आणि ३३ लाख टन मालाची वाहतूक करते. भारतीय रेल्वेच्या मालकीत १२,१४७ इंजिने, ७४,००३ प्रवासी डबे आणि दररोज ८,२०७ प्रवासी गाड्यांसाहित एकूण १३,५२३ गाड्या घावतात. रेल्वेला देशभरातील लाखो लोक स्वस्त आणि सुरक्षित प्रवास म्हणून प्राधान्य देतात. मात्र नुकताच नरेंद्र मोदी सरकारने एक जनता विरोधी व देशाच्या अर्थव्यवस्थे विरोधी निर्णय घेऊन रेल्वेच्या खाजगीकरणाला वाट मोकळी करून दिली आहे.
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार या खाजगीकरणाच्या निर्णयामुळे खाजगी क्षेत्रातून 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, जलद गतीने प्रवास होईल व प्रवासी भाडे कमी होईल. परंतु अशी ही जनतेची दिशाभूल आहे.
आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेतला तर खाजगी क्षेत्र स्वतः काहीच गुंतवणूक करत नाही. आपल्या देशातल्या विविध बँकेतून मोठी कर्जे घेतली जातात, त्यातून सरकारी मालमत्ता खाजगीकरणाच्या माध्यमातून कवडीमोल किमतीत लुटली जाते. त्यानंतर काही दिवस हे उद्योग चालवतात आणि नंतर ते बंद पडतात किंवा एनपीए होतात, अडचणीत व तोट्यात येतात कर्जपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक बँका… हा आपला सार्वत्रिक अनुभव आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला किंवा रोजगार निर्मितीसाठी खाजगीकरणाच्या धोरणाचा फारसा फायदा झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे. यापूर्वी ज्या ३ रेल्वेगाड्या खाजगी कंपन्यांना चालविण्यास देण्यात आल्या आहेत त्याचा काय अनुभव आहे, खाजगी रेल्वेला भाडे जास्त असल्यामुळे नफा होतो हे खरेच आहे. हा नफा मात्र खाजगी रेल्वे कंपनीला मिळतो आणि खाजगी रेल्वे लेट झाली तर त्याचा दंड मात्र भारतीय रेल्वेला द्यावा लागतो असा उफराटा कारभार मोदी सरकारचा आहे. अशा शब्दात तोफ डागली.
खाजगीकरणामुळे शिक्षणाचे आणि आरोग्य सुविधांचे काय झाले याचा आपण अनुभव घेत आहोत. परंतु सरकार मात्र या पासून काही शिकायला तयार नाही. खासगीकरणाचे परिणाम मात्र जनतेला भोगावे लागत आहेत.
यावेळी पोलिसांनी आंदोलनात हस्तक्षेप करत माजी नगरसेविका नसीमा शेख, सुनंदाताई बल्ला, गंगुबाई कनकी आदींना पोलिसांनी आंदोलनाच्या अगोदरच ताब्यात घेऊन दत्त नगर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण केले. पोलीस व कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळी माकपच्या १३८ कार्यकर्त्यांना अटक केले.
सदर आंदोलनात नलिनीताई कलबुर्गी, सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, युसुफ शेख (मेजर), म.हनीफ सातखेड, रंगप्पा मरेड्डी, मुरलीधर सुंचू, अशोक बल्ला, अनिल वासम, शकुंतला पाणीभाते, शंकर म्हेत्रे, लिंगव्वा सोलापुरे, दाउद शेख, बापू साबळे, विक्रम कलबुर्गी, अकिल शेख, नरेश दुगाने, जावेद सगरी, बाबू कोकणे, वासिम मुल्ला, मोहन कोक्कुल, सनातन म्हेत्रे, अप्पाशा चांगले, किशोर मेहता, दीपक निकंबे, रफिक काझी, बजरंग गायकवाड, सनी शेट्टी, रामस्वामी भैरी, बाळकृष्ण मल्याल, विजय हरसुरे, मधुकर चिल्लाळ, दिनेश बडगु, महादेव घोडके, असिफ पठाण, इलियास सिद्धिकी, नागेश म्हेत्रे, राम मरेड्डी, देविदास कोटा, शहबोद्दिन शेख, आरिफ मनियार, विनायक भैरी, आदीसह शेकडो कार्यकर्ते निदर्शने केली.