मुंबई : दूध दरवाढीसाठी छेडलेल्या आंदोलनाची दखल घेत सरकारकडून उद्या (मंगळवार, ता. २१) दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलवण्यात येणार आहे.
राज्यात गेल्या चार महिन्यांपासून ‘कोरोना’मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याने दूध संघ कमी दराने शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाचा हा व्यवसाय अडचणीत आला आहे. दूध दर वाढीकरीता दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने राज्यव्यापी आंदोलन छेडले होते, याची दखल घेत सदर बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे.
पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दुपारी दोन वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला महानंद’ चे अध्यक्ष, दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, विविध शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, तसेच राज्यभरातील विविध दूध संघांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उपस्थित राहणार आहेत.